-------------------
पाथरे येथे रक्तदान शिबिर
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जीवनज्योती रक्तपेढी यांच्या सहकार्याने पाथरे येथील श्रीकृष्ण मंदिराच्या आश्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर येथील तरुणांनी या शिबिराचे आयोजन केले होते. पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द व वारेगाव येथील दात्यांनी रक्तदान केले.
-------------
सावित्रीबाईंच्या जन्मदिनी व्हावे आदर्श पुरस्कार वितरण
सिन्नर : नाशिक जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांचे वितरण सावित्रीबाई फुले यांच्या जन्मिदनी व्हावे, अशी मागणी येथील महामित्र परिवाराच्या वतीने दत्ता वायचळे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना निवेदन देण्यात आले. मागील वर्षी या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील विविध गटातील शिक्षिकांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. या पुरस्कारांचे वितरण अद्याप झालेले नाही.
------------
चिमुकल्यांनी घेतला वनराई विकासाचा ध्यास
सिन्नर : तालुक्यातील वडझिरे शिवारातील खंडेराव महाराज मंदिर टेकडीवर चिमुकल्यांनी एकत्रित येऊन विविध जातीच्या झाडांची लागवड केली आहे. शेकडो फूट उंच चढाई करून चिमुकल्यांनी झाडांच्या संरक्षणासाठी लाकडी जाळ्या बनविल्या असून, वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. वनराई विकासाचा ध्यास घेतलेल्या चिमुकल्यांनी परिसरातील ग्रामस्थ व तरुणांसमोर आदर्श उभा केला आहे.
---------------
रक्तदानाद्वारे शेतकरी आंदोलनास पाठिंबा
सिन्नर : दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना मोदी सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानरूपी अभिनव आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष शरद शिंदे व सहकारी शेतकऱ्यांनी रक्तदान करून आंदोलनात सहभाग नोंदवला. मोदी सरकार आंदोलकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी प्रहारचे राज्य कार्याध्यक्ष बल्लू जंजाळ, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे, सरचिटणीस नितीन गवळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.