ठळक मुद्दे 'नाशिकचा राजा' राज महालात आकर्षक २८ फूटी मानाच्या राजाची गणेश मूर्ती गणेशोत्सवकाळात एकच रविवार
नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सव रंगात आला असताना शहरात रविवारी (दि.१६) संध्याकाळी गणेश मंडळांची आरास, देखावे बघण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने कुटुंबियांसह घराबाहेर पडल्याने गर्दी उसळली होती. जुने नाशिक, पंचवटी, कॉलेजरोड परिसरात मंडळांनी धार्मिक-सामाजिक विषय देखाव्यांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
गणेशोत्सवाचा रविवारी तीसरा दिवस जरी असला तरी पुढच्या रविवारी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवकाळात एकच रविवार येत असल्याने भाविक घराबाहेर पडले होते. पुढच्या चौथ्या शनिवारची शासकिय सुटीच्या निमित्ताने विसर्जनाच्या पुर्वसंध्येला गर्दी होण्याची शक्यता आहे. रविवार कारंजा येथील गणेश मंडळाने अष्टविनायक दर्शनाचा देखावा उभारला आहे. तसेच नामकोच्या धनवर्धिनी शाखेने नेहरु उद्यानाजवळ महाभारतातील भगवान श्रीकृष्णाच्या विराट रुप दर्शनाचा देखावा साकारला आहे. तसेच घनकर गल्लीमधील नवप्रकाश-सुर्यप्रकाश मित्र मंडळाने सुमारे २१ फूटी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राज महालात केली आहे. ही मूर्ती 'नाशिकचा राजा' म्हणून ओळखली जाते. शिवमुद्रा मित्र मंडळाने अशोकस्तंभ येथे आकर्षक २८ फूटी मानाच्या राजाची गणेश मूर्ती साकारली आहे. मेनरोड येथील गाडगे महाराज पुतळ्याजवळ शिवसेवा युवक मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईच्या देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. रामवाडी येथील विक्रांत युवक मित्र मंडळाने श्रीकृष्ण रासलिलेचा देखावा सादर केला आहे. मालेगाव स्टॅन्ड मित्र मंडळाने संत गोरोबा यांचा देखावा सादर केला आहे. सरदार चौक मित्र मंडळाने नृसिंह देखावा उभारला आहे.
काळाराम मंदिराच्या परिसरात मंडळाने विठूमाऊलीच्या दिंडी सोहळा थाटला आहे. पंचवटीमधील भगवती मित्रमंडळाने संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवितानाचा देखावा, पंचवटी कारंजा मित्र मंडळाने येथे कृष्णलीला, गुरूदत्त मित्र मंडळाने रावण वधाचा देखावा सादर केला आहे. भडक दरवाजा मित्र मंडळाने धोकादायक सेल्फीविषयीचा प्रबोधनपर देखावा मांडला आहे. तसेच श्रीमान सत्यवादी मित्र मंडळाने भगवान विष्णूचा देखावा, साई तिरंगा मित्र मंडळाने भगवान शंकराची विराट मुर्तीचा देखावा, रामकुंडावर आदिवासी जीवरक्षक मंडळाने भगवान दत्त यांच्या मुर्तीचा देखावा सादर केला आहे. त्याचप्रमाणे बी.डी.भालेकर मैदानावरही विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखावे उभारले आहेत. यामध्ये बॉश मंडळाने मोठा महाल साकारला आहे. एमएसएल मंडळाने दिंडीचा देखावा, मायको मंडळाने श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या वरदानाचा देखावा तर सराफ बाजार मित्र मंडळाने भालेकर मैदानावर सुवर्णकार गणेशाचा देखावा सादर केला.