नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्यासोबतचा वाद मिटेल आणि नाही मिटला तरी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हेच राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येवला येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात निधी वाटपावरून वाद पेटला आहे. त्यात कांदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत भुजबळ यांना पालकमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बैठकीनिमित्त आलेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले, छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार कांदे यांच्यातील वाद हा स्थानिक असून अंडरवर्ल्डमधून आलेल्या धमकीबाबत मला माहिती नाही.
ईडीच्या कारवाईबाबत बोलताना पाटील म्हणाले, अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांना नाहक अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सुडाचे राजकारण सुरू आहे. परमबीर सिंह यांना कोण वाचवत आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीप्रमाणे महागाईही वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीचा पैसा केंद्राकडे जातोय. महागाईचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे पाटील यांनी सांगितले.
भाजप मनसेसोबत युती करताना लाजतेय
- भाजपला मनसेसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, भाजप मनसेसोबत युती करायला लाजतेय, असे भाजप-मनसे युतीवर बोलताना पाटील यांनी सांगितले. जे येतील त्यांना बरोबर घेऊ.
- मात्र, स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय होईल, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत, याचा आगामी निवडणुकांशी संबंध नाही, असेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आघाडीबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले.