--------
घरपोच सेवेसाठी कर्मचाऱ्यांची वानवा
किराणा व तत्सम जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहतील. मात्र, नागरिक तेथे जाऊन खरेदी करू शकणार नाहीत, असे या आदेशात म्हटलेले असले तरी, बहुतांश छोट्या दुकानदारांकडे एखाद दुसरा कर्मचारी कामावर असतो, तर घाऊक विक्रेत्यांकडे देखील काहीशी अशीच व्यवस्था असल्याने घरपोच सेवा देण्यासाठी कर्मचारी कोठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. शिवाय नागरिकांनी कोणत्या दुकानदारांकडे वस्तूंची यादी सोपवायची व ते कधी व कसे मिळेल याबाबतची संदिग्धता कायम आहे. ग्राहकांबरोबरच दुकानदार देखील याबाबत अनभिज्ञ असून, ग्राहकच येणार नसतील तर दुकाने उघडून काय करणार, असा प्रश्न ते करू लागले आहेत.
----
दूध विक्रीच्या वेळेत पुन्हा बदल
कडक निर्बंध लागू करताना दूध या नाशवंत पदार्थाच्या विक्री व संकलनाबाबत पुन्हा फेरआदेश बुधवारी जारी करण्यात आले आहेत. पूर्वी सकाळी सात ते बारा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत परवानगी देण्यात आली होती. आता मात्र त्यात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार दूध घरपोच विक्री पूर्णत: शक्य नसल्यास दूध विक्री सकाळी सात ते नऊ व सायंकाळी पाच ते सात या वेळेत स्थानिक स्वराज्य संस्था निश्चित करेल अशा ठिकाणाहून करता येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, बुधवारी सायंकाळीपर्यंत नाशिक महापालिकेकडून कोणत्याही प्रकारच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या नव्हत्या.
----------
भाजीपाल्याची जागा निश्चित नाही
भाजीपाला विक्रीबाबत देखील महापालिकेने विक्रेत्यांना जागा निश्चित करून देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मोकळ्या जागा, सोसायटी परिसर व रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करता येईल, असे नमूद करण्यात आले असले तरी त्याबाबत विक्रेत्यांना कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती. तसेच विभागीय अधिकाऱ्यांकडून जागेसाठी मार्किंग करण्यात आलेले नव्हते.
------