नाशिक : कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी विविध पॅथी आणि विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात असून, त्यातच प्लाझ्मा थेरपीलादेखील राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी प्लाझ्मा संकलन करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयास परवानगी मिळाली असली तरी अद्यापही संबंधित मशीन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले नसल्याने सिव्हीलमध्ये प्लाझ्मा संकलनास प्रारंभ झालेला नाही. मात्र, अर्पण ब्लड बॅँकेत प्लाझ्मा संकलन सुरू झाले असून, जनकल्याण ब्लड बॅँकेतही या आठवड्यात संकलनास सुरुवात करण्यात येणार आहे.शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा रुग्णालयाने प्लाझ्मा थेरपीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, याआधी गत महिन्यात आलेले प्लाझ्मा संकलन मशीनच नादुरुस्त असल्याने ते परत पाठवावे लागले होते. त्यानंतर पुन्हा नवीन मशीन अद्यापही मिळाले नसल्याने जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा संकलनालाच प्रारंभ होऊ शकलेला नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीची प्रक्रिया त्यानंतरची असल्याने तीदेखील सुरू झालेली नाही. प्लाझ्मा संकलनाच्या सर्व तांत्रिक पूर्ततेनंतर प्लाझ्मा थेरपीसाठी जिल्हा प्रशासनाला मान्यतेची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्य शासनाने तात्विकदृष्ट्या प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिलेली असली तरी ही थेरपी ज्या रुग्णालयात केली जाते, त्या रुग्णालयाची विशेष पथकाद्वारे पाहणी केली जाते. तांत्रिकदृष्ट्या त्या रुग्णालयातील बाबींची पूर्तता झालेली असेल तरच त्या शासकीय रुग्णालयाला प्लाझ्मा थेरपीची मान्यता दिली जाते. प्लाझ्मा थेरपी ही अद्यापही प्रायोगिक स्तरावर असल्याने कोणत्याही रुग्णावर ती तितक्याच निगुतीने करावी लागते. त्यामुळे या मान्यतांना काही कालावधी जातो.मात्र, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाने या प्लाझ्मा थेरपीसाठी पुढाकार घेऊन तशा स्वरूपाची मान्यता मिळविण्यासाठी तांत्रिक पूर्तता करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाला कळवले आहे. प्लाझ्मा संकलन मशीन दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाकडून पाहणी झाल्यानंतरच प्लाझ्मा थेरपीची परवानगी जिल्हा रुग्णालयाला मिळू शकणार आहे.प्लाझ्मा दानाबाबतचे असे आहेत नियमजो १८ वर्षांवरील नागरिक कोरोनातून किमान २८ दिवसांपूर्वी पूर्णपणे बरा झालेला आहे. तसेच त्याचे वजन ५५ किलोंपेक्षा अधिक आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ पेक्षा अधिक राहून तो तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे.
जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा संकलनास अद्यापही प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 1:00 AM
कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी विविध पॅथी आणि विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात असून, त्यातच प्लाझ्मा थेरपीलादेखील राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी प्लाझ्मा संकलन करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयास परवानगी मिळाली असली तरी अद्यापही संबंधित मशीन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले नसल्याने सिव्हीलमध्ये प्लाझ्मा संकलनास प्रारंभ झालेला नाही.
ठळक मुद्देतांत्रिकबाबींची पूर्तता : शासनाच्या आरोग्य विभागाला सज्जता कळविली; लवकरच कार्यवाही होण्याची अपेक्षा