नाशिकरोड : महापालिका पाणीपुरवठा विभागाने गेल्या दोन दिवसांपासून चेहेडी पंपिंग येथील दारणा नदी बंधा-यातून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी उचलून नाशिकरोड भागांमध्ये पाणीपुरवठा केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून संबंधित विभागाचे अधिकारी मात्र एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
चेहडी पंपिंग येथील दारणा नदी बंधा-यातील मो-या बंद करून पाणी अडविण्यात आले आहे. सध्या तेथील साठलेल्या पाण्यात शेवाळे, डास असल्याने दुर्गंधी येत आहे. दारणा नदीचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. दारणा नदीपात्रात वालदेवी नदीचे दूषित पाणी येऊन मिसळते. त्यामुळे चेहेडी पंपिग बंधा-यात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी साचलेले होते. गेल्या दोन दिवसापासून पाणीपुरवठा विभागाने त्याकडे गांभीर्याने लक्ष न देता चेहेडी पंपिग येथून जलशुध्दीकरणात पाणी उचलून नाशिकरोड भागात पाणीपुरवठा केला. रहिवाशांनी पाण्याला दुर्गंधी तसेच मोठ्या प्रमाणात घाण येत असल्याच्या तक्रारी नगरसेवक व प्रशासनकडे केल्या. तरीही रविवारी चेहेडी पंपिगमधील पाण्याचा पुरवठा नाशिकरोड भागात करण्यात आला. बहुतांश रहिवाशी घराच्या छोट्या टाकीत पाणी साठवतात. त्या टाकीत फेसाळलेले व दुर्गंधायुक्त पाणी दिसून आल्याने आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एकीकडे कोरोना महामारीची भीती कायम असताना दुसरीकडे मनपा पाणीपुरवठा विभाग गांभीर्याने लक्ष न देता हलगर्जीने दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांच्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशांना घरी पिण्यासाठी साठवलेले पाणी फेकून देण्याची वेळ आली आहे. याबाबत पाणीपुरवठा विभाग अधिका-यांना विचारणा केली असता अधिकारी आपली जबाबदारी नसल्याचे सांगून दुस-या अधिका-यावर जबाबदारी ढकलून देत आहे. यामुळे दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(फोटो:आर:१०वॉटर)