नाशिक: जिल्ह्यातील २४ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा ३० टक्के इतकाच असल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे. यंदा एक दिवस आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शुभवार्ता असली तरी बदलत्या ऋतूचक्रामुळे पावसाची प्रतीक्षा देखील करावी लागत असल्याचा अनुभव असल्याने जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ५ टक्के साठा कमी असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन वर्षापूवी झालेला दमदार पाऊस तर गतवर्षात अखेरच्या चरणापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणे तृप्त झाली होती. त्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतू एप्रिल तसेच मे महिन्याच्या मध्यापर्यंत धरणसाठा कमी होऊ लागल्याने काटकसर करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मे महित्यातच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. आणखी काही टँकरची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. या कालावधीत उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले शिवाय उन्हाचा परिणाम देखील पाण्याच्या साठ्यावर झाल्यामुळे टँकर सुरू करण्याची वेळ आली.
गंगागूर, काश्यपी, गौतमी गोदावरी तसेच आळंदी या गंगापूर धरण समूहात सद्यस्थितीत ३४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी मे महिन्यात ४० टक्के इतका साठा शिल्लक होता. त्यामुळे शहरातील नागरिकांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता आहे. पालखेड तसेच गिरणा खोऱ्यातील मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये ११ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण जलसाठा ३० टक्के इतका असून मागील वर्षीच्या तुलनेत साठा पाच टक्क्यांनी कमी आहे.
--इन्फो--
जिल्ह्यातील धरणसाठा
गंगापूर: ४९
काश्यपी: १७
गौतमी गोदावरी:१२
आळंदी: १४
पालखेड:१०
करंजवण:१८
वाघाड:०४
ओझरखेड: १३
पुणेगाव: २८
तिसगाव: १०
दारणा: २५
भावली: २८
मुकणे: १३
वालदेवी: ७२
कडवा:१८
नांदूरमध्यमेश्वर: १००
भोजापूर: ११
चणकापूर: ४०
हरणबारी: ५३
केळझर: २९
नागासाक्या: ०६
गिरणा: ३९
पुनद: १४
माणिकपुंज: ००