नाशिक : दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, हस्तलिखिते, दुर्मिळ वस्तू, तांब्या-पितळ्याच्या व इतर धातुंच्या मूर्ती, परदेशी चलनातील नोटा व नाणी, टोकन, बॅच, शिवकालीन शस्त्रास्त्रे, अस्त्रे असा मौल्यवान खजिना, तितक्याच निगुतीने मांडलेले त्याचे प्रदर्शन, प्रत्येक स्टॉलवर त्याची माहिती देण्यास सरसावणारे इतिहासप्रेमी अभ्यासक, आजवर पुस्तकात अभ्यासलेले इतिहासकालीन नाणी, नोटांचे होत असलेले प्रत्यक्ष दर्शन यामुळे नाशिककर प्रेक्षक अचंबित झाले होते. निमित्त होते ‘रेअर फेअर’ नाणे प्रदर्शनाचे. कलेक्टर्स सोसायटी आॅफ न्युमिसमॅटिक अॅँड रेअर आयटम्स यांच्या वतीने या प्रदर्शनाला शुक्रवारी (दि.५) दिमाखात प्रारंभ झाला. इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या उद््घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी बी., राधाकृष्ण, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, इतिहास अभ्यासक गिरीश टकले, यशवंत निकुळे, संस्थाध्यक्ष अनंत धामणे, सचिव अॅड. राजेश जुन्नरे, खजिनदार राहुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. रविवार (दि.७)पर्यंत चालणाºया या प्रदर्शनात नाशिककरांना नाण्यांचा एक अनोखा खजिनाच पहायला मिळणार आहे. या प्रदर्शनात नाशिक, जुन्नर परिसरात सापडलेली सातवाहन काळातील कासे, लीड, चांदी व तांब्याची नाणी, गुलशनाबाद अर्थात नाशिकची चांदीची नाणी, पेशवे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, उदयपूरच्या राणाप्रताप चौहाण, बिकानेर, जयपूर, हैदरबाद व अहमदनगरच्या निजामाची नाणी, कच्छ राजाची नाणी, ब्रिटिशकालीन नाणी, नोटा, पोर्तुगीज, डच काळातील विविध नाणी पहायला व विकत घ्यायला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रदर्शनात अहमद अझर शेख यांनी जमविलेल्या शिवराय कालीन नाण्यांचा मोठा संग्रह प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आला आहे. या संग्रहात शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पिढीतील शासकांची, त्या काळातील नाणी ठेवण्यात आली आहेत. तसेच अंमळनेर येथील पंकज दुसाने याने जमविलेल्या इतिहासकालीन शस्त्रात्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरत आहे. या शस्त्रास्त्रांमध्ये तलवार, ढाल, खंजीर, कुलूप आदिंचा खजिनाच पहायला मिळत आहे.नाणे, नोटांबरोबरच या नाण्यांविषयी सखोल माहिती देणारी पुस्तके, ग्रंथ, मासिके, सीडी, डिव्हीडी आदी येथे पहायला मिळत आहे.या तीन दिवसांच्या प्रदर्शनात संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना इतिहास व छंदाची आवड निर्माण व्हावी या म्हणून काही नाणी व पोेस्टाची तिकिटे मोफत वाटण्यात येत आहे. इतिहासप्रेमी नाशिककरांनी बहुसंख्येने प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.सोन्याची मोहोरपौराणिक वा राजेरजवाड्यांच्या काळातील गोष्टी ऐकताना आपण ‘राजाने खूश होऊन इतक्या मोहोरा दिल्या’, ‘तितक्या मोहोरा चोरीस गेल्या’, गुप्तधनात अमुक इतक्या मोहोरा सापडल्या’ असे नेहेमी ऐकत आलो. अशा या गोष्टीतल्या सोन्याच्या मोहोरा या प्रदर्शनात पहायला मिळत आहे. शहरातील इतिहासप्रेमी संग्राहक विनयकुमार चुंबळे यांनी जवळपास लाखो रुपये किमतीची सोन्याची नाणी अर्थात मोहारा या प्रदर्शनात मांडून ठेवल्या आहेत. यात समुद्रगुप्त गुप्ता एम्पायर, ब्रिटिश इंडियाचे १८४१ साली काढलेले पहिले मोहोर नाणे, कुशान कनिष्कचे नाणे, ब्रिटिश इंडिया १८८१ सालचे मोहोर, दिल्लीच्या सुलतानाचे मोहोर नाणे असे असंख्य सोन्याचे नाणे अर्थात मोहोरा ठेवण्यात आल्या आहेत.दुर्मिळ नाणीवेस्टर्न छत्रप, मातीची पाणी, मुघल कालीन नाणी, शिवाजी महाराजांच्या राजवटीतील नाणी, टेराकोटा एरिकच नाणी, ब्राह्मी, पुलुमावी, सातवाहनराजा नाणी, वज्र-इंद्राच नाण, क्षत्रपकालीन नाणी, नहपन राजाचे नाणे अशी दुर्मिळ नाणी आहेत. याशिवाय पाच रुपयांची बेगम अख्तर, टाटा बिर्ला, मदर टेरेसा, संत अल्फोन्सा, भेल आदि विशिष्टकाळात आणि कमी प्रमाणात काढलेली नाणी येथे आहेत. ही नाणी ५० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. या नाण्यांवर झाड, डोंगर, राजा महाराजांचे चित्र, त्यांचे लाडके प्राणी, पशु-पक्षी, तत्कालीन देवीदेवता, लोकजीवन, संस्कृती, त्यांच्या घराण्याचे चिन्ह पहायला मिळायचे.
शेअर फेअर प्रदर्शन : इतिहासकालीन नाणी, देशी-विदेशी नोटाचलन पाहण्यासाठी गर्दी दुर्मिळ नाण्यांचा खजिना खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:52 AM
नाशिक : दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, हस्तलिखिते, दुर्मिळ वस्तू, तांब्या-पितळ्याच्या व इतर धातुंच्या मूर्ती, परदेशी चलनातील नोटा व नाणी, टोकन, बॅच, शिवकालीन शस्त्रास्त्रे, अस्त्रे असा मौल्यवान खजिना, नोटांचे होत असलेले प्रत्यक्ष दर्शन यामुळे नाशिककर प्रेक्षक अचंबित झाले होते.
ठळक मुद्देनाण्यांचा एक अनोखा खजिनाशिवराय कालीन नाण्यांचा संग्रह