नाशिक : सराफी दुकानासह कापड दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिणे व पन्नास हजार रुपयांच्या साड्या असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील कॅन्सर हॉस्पिटलजवळ असलेल्या एका सोसायटीत घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील अश्वमेघनगरमधील रहिवासी ज्ञानेश्वर माळवे यांचे नामको हॉस्पिटलजवळील राजदीप को-आॅपरेटिव्ह सोसायटीत दुकान आहे. चोरट्यांनी ९ व १० आॅगस्ट रोजी सोसायटीतील रोहित ज्वेलर्स व साक्षी सारीज् या दोन दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश केला. यातील सराफी दुकानातून दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र, १२ हजार रुपयांचे कडली जोड, २५ हजार रुपयांचे सोन्याचे मणी, ओम्पान, छोट्या अंगठ्या, कुडके, एक लाख रुपये किमतीचे तीन किलो चांदीचे तोरडे, साखळी, वाळे, अंगठ्या, जोडवे, भांडी, १७ हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही, ९ हजार रुपये असा १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़
तर साक्षी सारीज् या दुकानातून ५० हजार रुपये किमतीच्या पैठणी, सेमी पैठणी, सिल्क साडी व ड्रेस मटेरियल चोरून नेले़ या प्रकरणी माळवे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़