नाशिकरोड : जेलरोड पंचक सिद्धी रोहाउसच्या किचनच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्याने सात दिवसांपूर्वी चोरी केल्यानंतर दोन दिवसांनी बंगल्याच्या आवारात चोरलेले चांदीचे पंैजण, छल्ला व दागिने ठेवायच्या डब्या आणून टाकून दिले. चोरट्याच्या या कृत्याने सारेच अचंबित झाले आहेत. मुंबई चुनाभट्टी येथे राहणारे मंगेश रामचंद्र जाधव यांचे आई-वडील व बहीण हे जेलरोड पंचक सिद्धी रोहाऊस येथील राजगृह बंगल्यात राहतात. गेल्या १७ मे रोजी जाधव यांचे आई-वडील व बहीण हे वैष्णवदेवी येथे दर्शनासाठी गेले होते. २२ मे रोजी शेजारी राहणारे संतोष दोंदे यांना जाधव यांच्या बंगल्याच्या किचनचे खिडकीचे गज वाकवून चोरी झाल्याचे लक्षात आले. दोंदे यांनी सदर बाब जाधव यांना कळविताच ते नाशिकला दाखल झाले. बंगल्यातील लोखंडी व लाकडी कपाट उघडून सामान अस्ताव्यस्त टाकलेले होते. तसेच दागिन्यांची रेक्झिनची पाकिटे व काही डब्या बेडरूममध्ये पडल्या होत्या. याप्रकरणी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याने किचनच्या खिडकीचे गज वाकवून कपाटातील ७० हजार रुपये रोख व दागिने चोरीस गेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.चोरट्याच्या कृत्याने सारेच अचंबितजाधव यांच्या बंगल्यात चोरी झाल्यानंतर दोन दिवसांनी अज्ञात व्यक्तीने चोरलेले चांदीचे पैंजण, छल्ला व दागिने ठेवायच्या डब्या, रेक्झीनची पर्स बंगल्याच्या आवारात आणून टाकली. जाधव यांनी सदर बाब नाशिकरोड पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी त्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी पुन्हा चांदीच्या काही वस्तू व इतर साहित्य बंगल्याच्या आवारात आणून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चोरलेले दागिने चोरट्याने केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:00 AM