सटाणा : शहरातील वैष्णवी ट्रेडिंगचे संचालक महेश श्रीधर कोठावदे यांचा २५ टन कांदा परस्पर पाच लाखात विकून पसार झालेल्या हरयाणा येथील ट्रक चालक व मालक यांचा छडा लावण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कांदा व्यापारी कोठावदे यांनी २५ टन कांदा चेन्नई येथे ट्रक (क्रमांक आर.जे.२९ जी.ए. ७५०३) मधून पाठवला होता. मात्र ट्रकचालकाने ट्रक चेन्नई येथे न नेता सदरचा कांदा परस्पर विकला. या संदर्भात सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, वर्षा जाधव, पोलीस कर्मचारी अजय महाजन, धनंजय बैरागी, अनिल बहिरम, भाऊसाहेब माळी, जिभाऊ पवार यांचे पथक बनविण्यात येऊन ट्रक व ट्रकचालक शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तपासाअंती ट्रक वापी येथे गेल्याचे समजले. सटाणा पोलिस पथकाने वापी येथे जाऊन ट्रक, ट्रक चालक वाजीद किफायत मधी (वय २४) व सहकारी सुहेल अरशद मधी (वय १८) यांना ताब्यात घेऊन ट्रक जप्त केला. मालकाचा शोध घेतला असता अरसदखान फत्तेमोहम्मद खान (वय ३८) हरयाणा येथे मढी या गावी असल्याचे समजल्यावर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दरम्यान तीनही संशयित आरोपींना अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायमूर्तींनी २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
इन्फो
असा लागला छडा
ट्रकवर बनावट नंबर प्लेट व कागदपत्रेही असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रकचा तपास करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी टोल नाक्यावरील फास्टॅग, सीसीटीव्ही फुटेज, ट्रकचे वजन व ट्रकच्या फोटोचा आधार घेत तपास सुरू केला. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील पळासनेर टोल नाका तपासत मार्गाचा आधार घेत सदर बनावट नंबर प्लेट असलेला ट्रक दहिसर येथील टोल नाक्यावरून गेल्याचे आढळले व वापी येथे असल्याचे तपासात आढळून आले.
कोट...
शहरातील व्यापाऱ्यांनी आपला माल रवाना होण्यापूर्वी ट्रकचा फोटो, कागदपत्रे तसेच ड्रायव्हरचा फोटो, पॅनकार्ड, आधार कार्ड आपल्याकडे ठेवल्यास घडणाऱ्या अशा घटनांना नक्कीच आळा बसेल.
- सुभाष अनमूलवार, पोलीस निरीक्षक, सटाणा