इगतपुरी : मोटारसायकलस्वाराकडे पैसे आहेत म्हणून त्याचा घोटीपासून पाठलाग करत त्यास मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पिंप्रीसदो फाट्याजवळ अडवून रोडच्या कडेला शेतात नेऊन तोंड दाबून त्याच्या खिशातील १६ हजार रुपये जबरदस्तीने काढून पोबारा करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून इगतपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही जबरी चोरी मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या दीड महिन्यापूर्वी घडली होती.दि. २ डिसेंबर रोजी भानुदास शंकर मते (रा. तळेगाव रोड, इगतपुरी) यांना घोटीत एका व्यापाऱ्याने १६ हजार रुपये दिले. हे पैसे घेत असताना सदर आरोपींनी पाहिले होते. मते हे घोटीहून रात्री ९ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर घरी येत असताना त्यांचा तीन अज्ञात चोरट्यांनी पाठलाग करत त्यांना मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पिंप्रीफाट्याजवळ अडवून रोडच्या कडेला शेतात नेऊन तोंड दाबून त्यांच्या खिशातील १६ हजार रुपये जबरदस्तीने काढून पोबारा केला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना जबरी चोरीच्या गुन्ह्यात लुटणारा विलास ऊर्फअल्ट्या राजू तोकडे (रा. देवळा, ता. इगतपुरी) हा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी, पोलीस हवालदार नवनाथ गुरुळे, रवि शिलावट, शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, संदीप हांडगे, संदीप लगड, मगेंश गोसावी यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा करतेवेळी त्यांनी वापरलेली पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच १५ डीङब्ल्यू ७३८३) वापरल्याचे सांगितले. त्याच्या सोबत आणखी दोन साथीदार धनराज संजय तुपे व लक्ष्मण कोंडाजी तोकडे (रा. देवळा, ता. इगतपुरी) असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पल्सर मोटारसायकल व रोख एक हजार वीस रु पये जप्त करण्यात आले. (वार्ताहर)
मोटारसायकलस्वारास लुटणाऱ्या चोरट्यांना अटक
By admin | Published: January 17, 2017 1:48 AM