नाशिकरोड : दोन महिन्यांपूर्वी आयसीआयसीआय बॅँकेच्या पाठोपाठ नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम केंद्राच्या मशीनमध्ये बिघाड करून साडेनऊ लाखांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद बसथांबा येथील साईप्लाझा कॉम्प्लेक्समध्ये आयसीआयसीआय बॅँक एटीएम केंद्रात दोन महिन्यांपूर्वी आंबेडकर जयंतीला रात्री एटीएमच्या मशीनमध्ये बिघाड करून सोळा लाख २० हजारांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी गुजराथ पोलिसांकडून महम्मद शोएब कमालपाशा शेख, शंभू उर्फ करणसिंग रामधर सहदेव, निजामुद्दीन फक्रुद्दीन शेख, बजरंगसिंग श्यामसिंग, दुर्गाप्रसाद राघवेंद्रचंद्र झा, जहॉँगीर जमाल शेख या सहाजणांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर गुरूदेव कॉम्प्लेक्स येथे स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. इपीएस कंपनी एटीम मशीन देखभालीचे काम करते. लॉजी कॅश कंपनीचे कल्पेश सिनकर, रवि मोहोड यांनी १३ मार्चला दुपारी ४ वाजता एसबीआयच्या एटीएममध्ये कॅश लोड केल्यानंतर २७ लाख ६१ हजार २०० रुपये शिल्लक होती. १७ मार्चला लॉजी कॅश कंपनीचे अधिकारी पुन्हा एटीएममध्ये रोकड लोड करण्यास गेले असता त्यांना एटीएम मशीनमधून २४ लाख ८८ हजार रुपये काढल्याचे मशीन काऊंटर स्लिपवरून समजले. मात्र प्रत्यक्षात बॅँक स्वीच काऊंटरवरून त्या एटीएममधून १५ लाख २८ हजार रुपयांची रोकडच काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. एटीएम मशीनमध्ये दोन लाख ७३ हजार २०० रुपयांची शिल्लक असल्याने नऊ लाख ६० हजार रुपये रकमेचा फरक निर्माण झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस एटीएम मशीनमध्ये बिघाड करणाऱ्या या टोळीच्या इतर सहकारी चोरट्यांचा व अजून किती ठिकाणी याप्रकारे चोरी झाली आहे याचा शोध घेत आहे. (प्रतिनिधी)
एसबीआयच्या एटीएममध्ये चोरी
By admin | Published: June 17, 2015 2:08 AM