लोहोणेर : महिंद्रा जिओ कंपनीचा ट्रॅक्टर झिरे पिंपळ येथून रविवारी (दि.१८) सायंकाळी चोरट्यांनी पिकअप जीपमध्ये टाकून चोरुन नेला होता. त्याचा सुगावा लागला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन जीप व चालकास ओळखले असून पुढील तपास करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त सोमवारच्या (दि.१९) लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असताना हा ट्रॅक्टर नेणाऱ्या पिकअप वाहनाचा तपास देवळा पोलिसांना लागला असून हे वाहन चांदवड तालुक्यातील एकरुख येथील असल्याचे उघड झाले आहे.रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान विठेवाडी येथील शेतकरी अशोक आहेर यांच्या झिरे पिंपळ येथील शेतातील शेडमधून महिंद्रा कंपनीचा जिओ हा ट्रॅक्टर चोरट्यांनी तुळजाभवानी नाव असलेल्या पिकअप जीप (एम.एच.०४ ए. इ.७४४८) मध्ये टाकून चोरुन नेला.याबाबत देवळा पोलिसांनी ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता हे वाहन चांदवडच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असता हे वाहन चांदवड तालुक्यातील एकरुख येथील असल्याचे समजले.तर हे ट्रॅक्टर सिन्नर येथे उतरवला असल्याचे पिकअप वाहन चालक योगेश निवृत्ती काळे (रा. एकरुख, ता. चांदवड ) याने कबूल केले आहे; मात्र चालक फरार आहे. हे ट्रॅक्टर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात जमा झाला नसल्याचे ट्रॅक्टर मालक योगेश आहेर यांनी सांगितले.याबाबत देवळा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला असून फरार असलेला वाहन चालक योगेश काळे याचा शोध देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.