पिंपळगाव बसवंत : येथून पुण्याला जात असलेल्या पिंपळगाव आगाराच्या एस.टी. बसवर संगमनेर घाटात हल्ला झाला. या घटनेत एक प्रवासी महिला जखमी झाली आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असला, तरी काही गाड्या धावत आहेत. पिंपळगाव-पुणे या बसवर संगमनेरच्या घाटात अज्ञात इसमाने दगड फेकला. यामधून चालक थोडक्यात बचावला. मात्र, तो दगड गाडीमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेला लागून त्या जखमी झाल्या. त्यानंतर तातडीने चालकाने बस रुग्णालयात नेली आणि जखमी महिलेवर उपचार करून पुढचा प्रवास केला. सदर घटनेची माहिती पिंपळगाव आगाराला कळवून तशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे दुसऱ्या दिवशीची पिंपळगाव-पुणे बस रद्द करण्यात आली आहे.
पिंपळगाव आगाराच्या बसवर दगडफेक; महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 1:39 AM