सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील वावी ते पाथरे दरम्यान शुक्रवार (दि.२०) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास खासगी आराम बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. यात तीन बसचे नुकसान झाले असून एका बसच्या चालकाला फुटलेली काच लागून तो जखमी झाले असल्याचे समजते. शिर्डीहून नाशिककडे येणाऱ्या व गुजरातकडे जाणाºया या बस आहेत. शिर्डी येथे दर्शनासाठी नाशिकमार्गे गुजरात व अन्य भागातून अनेक भाविक खासगी बसेसने प्रवास करतात. फटका पॉईट म्हणून काही वर्षापूर्वी कुप्रसिध्द असलेल्या मिरगाव परिसरात हा प्रकार घडला असल्याने वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे. त्रिमूर्ती, ईगल व पटेल ट्रव्हल्सच्या या बसच्या दर्शनी काचेवर अज्ञात हल्लेखोरांनी दगड फेक करून नुकसान केले. हा हल्ला करणारे तीघे जण होते व ते पल्सर अथवा सीबीझेड मोटारसायकल वरून आले असावेत असा संशय बस चालकांनी व्यक्त केला. दगड फेक झाल्यावर पाठीमागे आणखी बस येत असल्याने एका चालकाने बस थांबवली असता अंधाराचा व रिमझिम पडणा-या पावसाचा फायदा घेत हल्लेखोर पसार झाले. दगडफेकीमुळे एका बसच्या चालकाच्या पायात काच घुसून तो जखमी झाला आहे. दरम्यान, वावी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळाल्यानतंर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र घाबरलेले बस चालक नाशिककडे रवाना झाले होते. पोलीसांनी पाथरे, मिरगाव, मलढोण, सायाळेसह परिसरात संशयीत दुचाकीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत पोलीसांकडून शोध मोहीम सुरूच होती.
सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 3:16 PM