त्र्यंबकेश्वर : ब्रह्मगुंफेजवळ ब्रह्मगिरीची दरड कोसळून दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २६) घडल्यानंतर परिसरात घबराट पसरली आहे.
मागील आठवड्यात गंगाद्वार येथे मंदिर प्रांगणात पावसामुळे दरडीचा काही भाग कोसळला होता. या गोष्टीला १२ दिवस होत नाही तोच ही घटना घडली. महाराष्ट्रात अशा घटना सध्या घडत आहेत. तसाच काहीसा प्रकार अंजनेरी येथेही मागच्या आठवड्यात छोट्या प्रमाणात घडला. असेच माती, दगड-गोटे गंगाद्वार व ब्रह्मगिरीला पडले.
दरम्यान, कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्गरम्य परिसर तसेच गडकोट, किल्ले, पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असले तरी पर्यटक मात्र चोरवाटांचा वापर करून अशा ठिकाणी येतात. ब्रह्मगिरीवरून दगड, माती पडल्याने दोघेजण किरकोळ जखमी झाल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले.