नाशिक : कृषीनगर ते महात्मानगर होणारा सायकल ट्रॅक तसेच शासनाच्या वनमहोत्सवात अंतर्गत बारा हजार झाडे लावण्याच्या निमित्ताने स्थायी समितीमधील सदस्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शरसंधान करीत तर कधी त्यांचे उपरोधिकपणे कौतुक करीत टीका केली आणि त्यांचे प्रस्ताव रोखून धरीत कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांवर टीका करताना थेट आमच्यावर दादागिरी करतात का, आम्हाला भेटणे टाळून मर्दानगी दाखवतात काय, असा थेट प्रश्न सभागृह नेता दिनकर पाटील यांनी बैठकीत केला आहे. त्यामुळे आयुक्त विरुद्ध सदस्य असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.स्थायी समितीची बैठक गुरुवारी (दि.१२) सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी हा प्रकार घडला. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीस आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते. त्यावेळी आयुक्तांवर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या सदस्यांनी गुरुवारी मात्र मुंढे यांच्यावर आरोप करीत त्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप केला.श्वान निर्बीजीकरणाचा ठेका गेल्या आठवड्यात स्थायी समितीने मंजूर केला होता. मात्र त्यावेळी मागितलेल्या माहितीच्या निमित्ताने गुरुवारी जोरदार चर्चा करतानादेखील आयुक्तांना लक्ष्य करण्यास सुरुवात करण्यात आली. विशेषत: सभागृह नेता दिनकर पाटील यांनी आयुक्तांचा अधिकाºयांवर अंकुश नसल्याचा आक्षेप केला. तसेच आयुक्त केवळ नगरसेवकांवरच दादागिरी करतात, असाही त्यांनी आक्षेप घेतला. राज्य शासनाच्या वतीने १३ कोटी झाडे राज्यात लावण्यात येणार असून,प्रशासकीय प्रस्ताव रोखून आयुक्तांची कोंडी(पान १ वरून)त्याअंतर्गत १२ हजार झाडे महापालिकेला लावणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. परंतु १ जुलैस आयुक्त मुंढे यांनी वृक्षारोपण केले आणि त्यानंतर ३ जुलैस निविदा उघडण्यात आल्या हा काय प्रकार आहे, असा प्रश्न करीत पाटील यांनी वृक्ष विभागाचे अधिकारी महेश तिवारी माहिती देत असताना आयुक्त खूप चांगला माणूस आहे, रात्रंदिवस काम करतो, त्यांची फसवणूक करू नका, आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि तुम्ही मात्र त्यांची फसवणूक का करतात, असा प्रश्न करीत उपरोधिक टोलेबाजी केली.समीर कांबळे यांनी कृषीनगर ते महात्मानगर जॉगिंग ट्रॅकदरम्यान सायकल ट्रॅक करण्याचा प्रस्ताव आपणच दिला, परंतु आपल्याला या प्रस्तावाची माहिती मिळाली नसल्याने तो नामंजूर करावा, अशी मागणी केली. तर महात्मानगर हा श्रीमंतांचा भाग तेथे जॉगिंग ट्रॅकबरोबरच सायकल ट्रॅकही होतो. मात्र नांदूरमानूरसारख्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक का होत नाही. तेथे गरीब शेतकरी राहतात म्हणून त्यांना डावलले जाते काय? असा प्रश्न करीत उद्धव निमसे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे आल्यानंतर हा भेदाभेद दूर होऊन ते समतोल विकास साधतील, अशी अपेक्षा होती. मात्र मुंढे हे श्रीमंतांचीच पाठराखण करीत असल्याचा आरोप केला.आयुक्तांनी सादर केलेल्या सायकल ट्रॅकच्या विषयापाठोपाठ वृक्षारोपणाचा तसेच मौजे देवळाली येथील सर्व्हिस रोडच्या भूसंपादनासाठी निवाड्याची अंदाजित ५० टक्के म्हणजेच २ कोटी ४ लाख रुपये भरण्यास मान्यता देण्यास विरोध करण्यात आला. तथापि, सभापती आडके यांनी हा विषय मंजूर केला.ठेकेदारासाठी महापालिकाच ‘खड्ड्यात’राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत १२ हजार झाडे लावण्यासाठी महापालिकेने एप्रिल महिन्यातच बारा हजार खड्डे खोदले आणि दुसरीकडे निविदा काढताना ठेकेदाला खड्डे खोदण्याची अटही घालण्यात आली. मग महापालिकेने अगोदर खड्डे ठेकेदाराच्या सोयीसाठी खोदले का असा आरोप करीत स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.शासनाचा हा कार्यक्रम असल्याचे सांगितल्यानंतर दिनकर पाटील यांनी शासन आमचेच आहे, परंतु त्यासाठी महापालिका खर्च करणार आहे, असे सांगत उद्यान विभागाचे महेश तिवारी यांना जाब विचारला. ठेकेदाराला झाडे संवर्धन करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी कोणत्या निकषाच्या आधारे दिला, ट्री गार्डचा उल्लेख ठेक्यात का नाही, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. परंतु सभापतींनी हा विषय मंजूर केला.