चांदवड : तालुक्यातील दिवसातील भारनियमन बंद करून ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाइट सुरळीत करण्यात यावी, निमोण येथे सबस्टेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.चांदवड पंचायत समितीच्या आमसभेत विविध समस्यांवर चर्चा झाली तर पाणी, वीज, रस्ते यावर चर्चा करताना विजेच्या संदर्भात शेतकरी संतप्त झाले. शेतीला पाणी येण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा रुग्णांना चांगली मिळत नसल्याने यासाठी येत्या मार्च महिन्यात स्वतंत्र बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविणार असल्याचे आमदार डॉ. अहेर यांनी सांगून अशा प्रकारच्या विविध मुद्द्यांवर सभेत अनेकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. मीटर रीडिंगचे काम बचत गटाला ठेका द्यावा अशी मागणी नांदूरटेकचे सरपंच प्रभाकर ठाकरे यांनी केली. कृषी विभागाच्या विषयात मागेल त्याला शेततळे या योजनेत अवघ्या पन्नास हजार रुपयांमध्ये शेततळे होत नाही, त्यास दोन लाखांपर्यंत निधी द्यावा, अशी मागणी वडनेरभैरवचे उपसरपंच रावसाहेब भालेराव यांनी केली. सामाजिक वनीकरणाच्या कामांचा आढावा सादर करण्यात आला. भूमिअभिलेखचा विषय चांगला गाजला. त्यात मोजणीसाठी पैसे व जाण्या-येण्याचा खर्च मागितला जातो, असा आरोप उपस्थितांनी करताच भूमिअभिलेख अधिकारी राजेंद्र कपोते यांनी लेखी द्या असे सांगताच आमदार डॉ. अहेरांनी त्यांना खडे बोल सुनावत म्हणजे येथील सभेत नागरिक काय खोट्या तक्रारी करतात काय? असे सुनावले व पैसे मागणाºया त्या कर्मचारी किंवा दलालावर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. माजी उपसभापती मधुकर अण्णा जाधव यांनी पोल्ट्री व्यवसायाला कृषी विभागामार्फत मदत करावी अशी मागणी केली, तर यावेळी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, नितीन अहेर, कारभारी अहेर, अमोल भालेराव, बाकेराव जाधव, माजी उपसभापती मधुकर अण्णा जाधव, रावसाहेब भालेराव, अन्वर शहा, अशोक भोसले, विजय पुंजाराम जाधव, मधुकर जाधव, निवृत्ती शिंदे, भीमराव जेजुरे, भीमराव निरभवणे, सोमनाथ पगार, प्रभाकर ठाकरे, विजय गांगुर्डे, योगेश ढोमसे, संदीप काळे, विलास भवर, डॉ. दिलीप शिंदे, शरद पाटील, सुभाष पूरकर, विजय पगार यांनी आपापल्या भागातील वीज, पाणी, रस्ते, भूमिअभिलेख, तहसील कार्यालय, मोजणी आदी समस्या मांडल्या. प्रास्ताविक गटविकास अधिकारी हिरामण मानकर यांनी केले, तर सूत्रसंचालन जर्नादन देवरे, सुनील सोनवणे यांनी केले. यावेळी एस.टी. महामंडळाचे दत्तप्रसाद बागुल, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, विजय पवार, भूमिअभिलेखचे राजेंद्र कपोते, बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे, सहायक निबंधक सविता शेळके, कुंदन दंडगव्हाळ, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांनी आपापल्या विभागाच्या समस्यांचे निराकरण केले.गेल्या आठवड्यात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे इन्फ्रा एकची कामे मंजूर आहेत. एरियावाइज ती कामे एकाच ठेकेदाराला दिली होती, त्यामुळे ती कामे बंद असून, शासनाने त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. लवकरच कामास सुरुवात होणार आहे. यामुळे ३०० मेगावॉट वीज उपलब्ध होईल. यावेळी शेतकºयांना दिवसा वीज उपलब्ध होऊ शकते . - डॉ. राहुल अहेर, आमदार
चांदवड तालुक्यातील दिवसाचे भारनियमन बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:07 AM