कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, बोरखिंड, शेणीत परिसरात रस्त्याने अनेक ठिकाणी मोकळ्या माळरानात आग लागल्याचे, वणवा पेटल्याचे चित्र दिसत आहे. पण ही आग डोंगरमाथ्यावरील, बांधावरील गवताची असल्याने गवत पेटवून देऊ नका, निसर्गाचा ऱ्हास थांबवा असा सल्ला साकूर येथील पर्यावरणतज्ज्ञ प्रा. मधुकर सहाणे यांनी दिला आहे.सहाणे यांनी सांगितले, माळरान, बांध, डोंगरमाथ्यावरील गवत नष्ट केल्याने आपलेच नुकसान होत आहे. गवत पेटवल्याने माती उघडी होते. उन्हामुळे माती तापते, सैल होते आणि वाऱ्याबरोबर जीवनसत्त्वे उडून जातात. जमिनीची पोषकता नष्ट होते. त्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. तो वाढवायचा असेल तर गवत हाच मोठा उपाय आहे.
यावर्षी अतिवृष्टी झाल्याने गवत मोठ्या प्रमाणात आले असून, सुमारे एक ते दीड फूट उंच आहे. निसर्गाचे हे देणं आहे, ते जपले पाहिजे. गवत असेच ठेवले तर मातीची पोषकता वाढेल, पाऊस पडला तरी निवळसंग पाणी येते. उलट जाळले तर पाणी खडूळ येते अन् जमिनीचा एक थर वाहून जातो.
गवतामध्ये लपलेले पक्षी, प्राणी यांची शिकार करण्यासाठी काही जण गवत पेटवून देतात अन् रात्रभर आग धुमसत राहते. प्राणी सैरावैरा धावतात पण ही निसर्ग संपत्ती आहे. त्यांच्यामुळे मातीची पोषकता वाढते. त्यामुळे गवतांना आगी लावणे थांबविण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.(१७ आग)साकूर परिसरातील माळरानावर पेटलेले गवत.