विशेष म्हणजे महापालिकेत एवढा मोठा गोंधळ सुरू असताना या वादग्रस्त विषयावर अधिकारी आणि पदाधिकारी गप्प का बसलेत, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांचे स्वपक्षीयही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
महापालिकेच्या पंचवार्षिक कारकिर्दीचे हे शेवटचे वर्ष असून, त्यामुळे अनेक प्रकार सध्या वादात सापडले आहेत. त्यात दिनकर पाटील यांनी आयुक्तांना पत्र देतानाच या विषयावर प्रशासनाकडून सुरू असलेल्या अनियंत्रित कामांबाबत आयुक्तांनाच जाब विचारला आहे. मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौकात उड्डाणपुलांचे काम सुरू होण्याआधीच ४४ कोटी रुपयांचा खर्च कसा काय वाढला, घंटागाडीचा ठेका तीन वर्षात १७६ कोटी रुपयांवरून ३५४ कोटी रुपयांवर कसा काय पोहोचला, असा प्रश्न करताना पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासाठीसुद्धा महापालिका चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपये मेाजत आहे, असा आरोप केला आहे. बीओटीच्या नावाखाली ११ भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यासही त्यांनी विरोध केला आहे.
महापालिकेतील अधिकारी व पदाधिकारी जनतेच्या पैशांची लूट सुरू असताना मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्ट कारभार थांबला नाही तर थेट जनआंदोलन उभे करण्याचा इशारा पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे.
इन्फो...
भाजपच्या पार्टी मीटिंगमध्येही विषय गाजणार
महापालिकेची महासभा येत्या सोमवारी (दि. २३) होत असून, त्यासाठी बुधवारी (दि. १८) पक्षाची ऑनलाइन पक्ष बैठक होणार आहेत, त्यात अनेक नगरसेवकांनी या विषयावर प्रश्न विचारण्याची तयारी केली आहे.