देशभरातील मालवाहू वाहने महामार्गावरून दळणवळणासाठी धावत असतात. या मालवाहू वाहनांच्या चालकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली केली जात होती. या अवैध वसुलीचा आकडा कोट्यवधींच्या घरात पोहोचलेला होता. वाहन मालक-चालकांकडून सातत्याने तक्रारी संघटनेच्या कार्यालयात प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलतरणसिंग अटवाल, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष विजय कालरा अमृतलाल मदान, अंजू सिंघल यांच्या आदेशान्वये पदाधिकाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. याबाबतचे गाऱ्हाणे मांडले. विभागाला खात्री पटल्यानंतर कोकणगाव फाटा येथे सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयित लाचखोर महिला सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम व पोलीस नाईक उमेश सानप यांना वाहतूकदारांकडून आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पडकले. शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला संघटनेचे नाशिक, धुळे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, किरण भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महामार्ग पोलिसांची अवैध वसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:13 AM