इंदिरानगर : मुंबई नाका ते पाथर्डी फाटा या समांतर रस्त्यावरील रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक काही थांबायचे नाव घेत नाही. जीवितहानी होण्याची वाट तर शहर वाहतूक पोलीस विभाग पहात नाही ना, असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.मुंबई नाका ते पाथर्डी फाटा या समांतर रस्तालगत विविध उपनगरे आहेत. यामध्ये भारतनगर, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर यांसह विविध उपनगरे आहेत. या उपनगरांमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक वास्तव्य करीत आहेत. यातील शेकडोच्या संख्येने विद्यार्थीवर्ग शहरात दररोज शिक्षण घेण्यासाठी आणि नागरिक नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करतात. त्यासाठी लागणारी शहर वाहतूक बससेवेची सुविधा अपुरी पडत असल्यामुळे पर्यायांनी बहुतेक जण रिक्षांचा वापर करतात. त्यामुळे समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रिक्षा धावतात. मात्र रिक्षाचालक जास्तीत जास्त प्रवासी घेऊन आर्थिक फायदा कसा होईल यासाठी चालकाशेजारी दोन ते तीन आणि पाठीमागील सीटवर सहा ते सात प्रवासी घेऊन जीवघेणा प्रवास करतात. त्यामुळे लहान-मोठे अपघातांचे प्रमाणात वाढले आहे.
रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक काही थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:36 AM