लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे सुरक्षा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ‘जॉब दो जवाब दो, फसवणीस सरकार जॉब दो’ अशा घोषणा देत कार्यकर्ते रेल्वेस्थानकात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना रेल्वे सुरक्षा पोलिसांनी अडविले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनमाड-भुसावळ रेल्वे थांबवून सरकारचा निषेध केला.
सरकारच्या नियोजनशून्य व निष्क्रिय धोरणामुळे सव्वा कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले. युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली होती. परंतु सरकारच्या या अपयशी धोरणांमुळे असलेले रोजगार गमावण्याची वेळ जनतेवर आली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मुलांना नापीक पदरात पडली असताना दुस-या क्षेत्रातही रोजगार या सरकारने ठेवला नाही. सरकार राजकीय पोळी भाजण्यासाठी बेरोजगार तरुणांचा वापर करत आहे. साडेचार वर्षांत सरकारने पोकळ आश्वासने दिली, अभ्यास करून उत्तरे देऊ या भूमिकेपलीकडे काही केले नाही. शिक्षण घेऊनही हाताला रोजगार नसल्यामुळे हताश झालेले अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळले आहेत. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रेल रोको आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सचिन पिंगळे, योगेश निसाळ, अॅड. चिन्मय गाढे, धिरज बच्छाव, सुनील कोथमिरे, विजय जाधव, शिवराज ओबेरॉय, डॉ. संदीप चव्हाण, श्याम हिरे, हिमांशू चव्हाण, रेहान शेख, राजू उफाडे, नदीम शेख, गणेश गायधनी, जयराम शिंदे, संदेश टिळे, निखिल भागवत, तुषार खांडबहाळे, दीपक गायकवाड, गोरख ढोकणे, रवि बस्ते आदी उपस्थित होते.(फोटो १८ एनसीपी)