सिन्नर : भोजापूर धरणाचे पूरपाणी पूर्व भागातील दुशिंगपूर व माळवाडी (फुलेनगर) बंधाºयात सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभाग पाळत नसल्याच्या निषेधार्थ वावी परिसरातील शेतकऱ्यांनी सिन्नर-शिर्डी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी तात्काळ दुशिंपूर बंधाºयात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन पंधरा मिनिटांत थांबविण्यात आले. वारंवार निवेदन देऊन व उपोषण करुनही पाटबंधारे विभागाकडून दुशिंगपूर व माळवाडी बंधाºयात पाणी सोडण्यास दुजाभाव केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करीत मंगळवारी सकाळी सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या नेतृत्त्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त महामार्गावर तैनात करण्यात आला होता. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, नबाजी खरात व दुशिंगपूरचे उपसरपंच कानिफनाथ घोटेकर यांच्या नेतृत्त्वाखाली दुशिंगपूर, कहांडळवाडी, माळवाडी (फुलेनगर), व वल्हेवाडी यांनी शेतकºयांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी आंदोलनकर्ते व पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता बी. व्ही. बोडके, बी. के. आचट, वाय. बी. डुकळे यांच्यात चर्चा घडवून आणली. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर दुशिंगपूर बंधाºयात पाणी सोडण्याचे दिलेले आश्वासन का पाळले नाही असा संतप्त सवाल शेतकºयांनी उपस्थित केला. भोजापूर धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी चारी क्रमांक चार ला सोडून ते निमोण हद्दीत वळवून देण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करुन त्यास पाटबंधारे विभागाचे सहकार्य असल्याचे सांगितले. दुशिंगपूर व फुलेनगरबंधा-यात पाणी सोडण्याचे आश्वासन पाळले जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर उपअभियंता पाटील यांनी वितरिका क्रमांक चार ला तात्काळ पाणी सोडून ते दुशिंगपूर बंधाºयापर्यंत पोहचविण्यात येईल, रस्त्यात चारी कोणी फोडल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. ताबडतोब पाटबंधारे विभागाचे कर्मचारी निमोण हद्दीत वळविण्यात आलेले पाणी बंद करुन ते दुशिंगपूर बंधाºयात सोडतील असे सांगितले. त्यानंतर संतप्त शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. आंदोलनात विजय शिंदे, नबाजी खरात, कानिफनाथ घोटेकर यांच्यासह चंद्रभान तांबडे, नितीन अत्रे, वावीचे उपसरपंच विजय काटे, भास्कर कहांडळ, भारत यादव, सुधाकर भगत, कन्हैयालाल भुतडा, प्रशांत कर्पे, कचरु घोटेकर, ईलाहीबक्ष, धनंजय बहिरट, गोरक्षनाथ देव्हाड, कैलास ढमाले यांच्यासह दुशिंगपूर, फुलेनगर, वावी, वल्हेवाडी, कहांडळवाडी येथील शेतकरी सहभागी झाले होते.
पाण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 4:32 PM