त्र्यंबकेश्वर : ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागात लादलेले भारनियमन रद्द करणे, अवाजवी बिल व महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात गुरुवारी अंजनेरी फाटा येथे काँग्रेस पक्षातर्फे तालुका अध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.वाढते भारनियमन होत असल्याने महावितरण फुकट वीज शुल्क आकारत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ग्रामीण भागात सायंकाळच्या भारनियमन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी यावेळी करण्यातआली.रास्ता रोकोप्रसंगी जोपर्यंत लेखी आश्वासन देणार नाही, तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली. महावितरण कार्यालयाचे सहायक उपअभियंता किशोर सरनाईक यांनी उपस्थितांना तुमच्या मागण्या वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत कळविणार असल्याचे सांगितले. आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. गेल्या आठवड्यापासून भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते संताप व्यक्त करत होते. काँग्रेसच्या शिष्टमंडळातर्फे तहसीलदार महेंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, सचिन साळुंखे, चंद्रकांत पाटील यांनी बंदोबस्त ठेवला होता.यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप मुळाणे, कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, आदिवासी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बदादे, दिनकर मोरे, सुनील मोरे, निवृत्ती महाले, यशवंत महाले, कोंडाजी महाले, नवनाथ चव्हाण, आनंदा चव्हाण, बबन मोरे, राजाराम चव्हाण, सुरेश चव्हाण, पांडुरंग आचारी, दिनेश पाटील, संतोष डगळे आदी उपस्थित होते.
वीज कंपनीविरोधात अंजनेरीला रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:26 AM