दिंडोरी : येथील पालखेड चौफुली येथे सकाळी शिवसेनेच्या वतीने तांगा शर्यतीवर असलेली बंदी उठवावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या पिकाला कवडीमोल भाव असून, शेतकरीवर्ग अनेक समस्यांअभावी संकटात सापडला आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेता शेतकऱ्याच्या समस्या तत्काळ मान्य कराव्यात, असे प्रतिपादन दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडोरी येथील पालखेड चौफुली येथे शेतकऱ्यांच्या मागणीबाबत रास्ता रोकोप्रसंगी केले. यावेळी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुनील पाटील, फळबाग संघाचे अध्यक्ष वसंत कावळे, माजी तालुकाप्रमुख सतीश देशमुख, उत्तम जाधव, जि.प. गटनेते प्रवीण जाधव, उपतालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, नाना मोरे, शहरप्रमुख रमेश बोरस्ते, सुनील जाधव आदिंच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करत तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवाना सावरण्यासाठी शिवसेना पक्ष भक्कम असून, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे सुरेश डोखळे, प्रवीण जाधव, वसंत कावळे यानी शेतकऱ्यांबाबत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. एक तास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)
दिंडोरीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Published: January 26, 2017 1:00 AM