येवला : राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्णत: कोरा करावा, केंद्र सरकारचा आरसीईपी हा राष्ट्रीय करार रद्द करावा यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांसंदर्भात बुधवारी (दि.8) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करून पोलीस निरीक्षक संदीप कोळी व नायब तहसीलदार राऊत यांना निवेदन देण्यात आले. रास्ता रोकोमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.केंद्र सरकारने १६ देशांसोबत आरसीइपी हा राष्ट्रीय करार केला आहे. मात्र यामुळे इतर देशातील दूध पावडर आपल्या देशात आयात होणार असून परिणामी आपल्या देशात ती दुपटीने विकली जाणार आहे. पर्यायाने येथील गाईच्या दुधाचे दर सतरा ते अठरा रु पयांवर प्रतिलिटरपर्यंत घटणार आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याने असे होऊ नये म्हणून केंद्र सरकारने या करारातून दुग्धजन्य पदार्थ व शेतमाल वगळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष श्रावण देवरे, मच्छिंद्र जाधव यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरचिटणीस रवींद्र तळेकर, गोरख हजारे, राजेंद्र जाधव, संतोष देवरे, सोपान देवरे, कैलास देवरे, कैलास सोनवणे, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर नरोडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 10:29 PM