नाशिक : पतंग उडविण्याची हौस नायलॉन मांजाच्या वापराने भागविली जात असल्यामुळे हा मांजा पक्ष्यांसह मानवासाठीही धोक्याचा ठरू लागला आहे. यामुळेच नायलॉन मांजाचा वापर-विक्रीवर कायदेशीर बंदी जाहीर करण्यात आली आहे. तरीदेखील सर्रासपणे नायलॉन मांजा पतंगबाजीसाठी वापरला जात असल्याचे यावर्षी संक्रांतीच्या दिवशी सिध्द झाले. नायलॉन मांजाच्या उत्पादनावर सरकारने थेट बंदी घालावी. पोलीस प्रशासनाकडून यावर्षी कारवाईचे प्रमाण कमी होते. पक्षी किती गंभीर जखमी होतात, त्यांच्या जखमा कधीही न भरून येणाऱ्या असतात. काही पक्ष्यांना कायमचे अपंगत्व येते. उत्पादन थांबविले तर विक्री अन् वापर दोन्ही थांबेल, असे मत इको-एको फाउण्डेशनच्या स्वयंसेवक वन्यजीवप्रेमी सुखदा गायधनी यांनी व्यक्त केले.
- नायलॉन मांजाच्या बंदीबाबत काय सांगाल?
- नायलॉन मांजाचा वापर थांबता थांबत नसल्यामुळेच जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १९७३ च्या १४४ कलमान्वये जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नायलॉन मांजा, विक्री-वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र तरीही नायलॉन मांजा बाजारात चोरट्या मार्गाने उपलब्ध होतो. सरकारने बंदी विक्री, वापराबरोबरच उत्पादनावरही घालणे गरजेचे आहे.
- पोलीस कारवाईबाबत समाधान वाटते काय?
- मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आयुक्तालय हद्दीत तसे बघितले तर अगदी मोजक्याच कारवाया नायलॉन मांजा विक्रीच्या बाबतीत झाल्या. जुने नाशिक सारख्या भागात बोटावर मोजण्याइतक्या कारवाया झाल्या. इंदिरानगर, अंबड पोलीसांनीही अशाच पध्दतीने कारवाया केल्या. केवळ औपचारिकता म्हणून यंदा काही पोलीस ठाण्यांनी नायलॉन मांजाची चोरट्या मार्गाने होणारी विक्री थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसूने आले. शहर गुन्हे शाखांनी मात्र चोरट्या मार्गाने नायलॉन मांजा साठवणूकीकडे दुर्लक्षच केले.
- शाळांमधील शपथविधीचा काया परिणाम दिसून येतो?
- शाळा-शाळांमध्ये शपथचे कार्यक्रम घेतले जात असले तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. केवळ औपचारिकता म्हणून शिक्षकांकडून सामुहिक शपथ दिली जाते अन् घेतली जाते; मात्र एकदा शाळेचा वर्ग सुटला की ती शपथ विस्मरणात जाते, असे होता कामा नये. शिक्षकांबरोबरच पालकांनीदेखील पर्यावरणाविषयी जागरू राहणे गरजेचे आहे. निसर्गाची होणारी हानी टाळण्यासाठी शपथविधीसोबतच नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना होणारी गंभीर दुखापतदेखील सचित्र पॉवर पाइंट प्रेझेंटेशनद्वारे दाखविले गेले पाहिजे. जोपर्यंत मुळे स्वत: डोळ्यांनी बघणार नाही, तोपर्यंत त्यांना ती जाणीव होणार नाही, तसेच महाविद्यालयांमध्येही असाच उपक्रम घ्यायला हवा, कारण दहावी, ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून सर्रासपणे नायलॉन मांजा वापरला जातो.
- पक्षी जखमी होण्याचे प्रमाण यंदा कमी राहिले असे वाटते का?
- अजिबात नाही. कारण यावर्षी पहिल्याच दिवशी संक्रांतीचा सुर्यास्त होत नाही, तोच शहरात पक्षी जायबंदी होण्याचा आकडा २८पर्यंत पोहचला होता. तेव्हापासून आजपर्यंत दररोज पाच ते सहा ‘कॉल’ रेस्क्यूचे येत आहेत. यामध्ये एक कबुतर आणि वटवाघुळ मृत्यूमुखीही पडले. राज्यात ६३२ पक्ष्यांवर ‘संक्रांत’ ओढविली. एकूणच ही निसर्गाची होणारी अपरिमित हानी आहे. नायलॉन मांजा वातावरणात कुजत नाही, तो झाडांवर व अन्य ठिकाणी तसाच राहतो, त्यामुळे मांजाच्या जाळ्यात वर्षभर पक्षी अडकून जखमी होत राहतात.शब्दांकन : अझहर शेख