नाशिकरोड : भूसंपादन कायदा हा देशातील शेतकऱ्यांचे शोषण करणारा असून, तो तातडीने रद्द करावा व जिल्ह्यातील अन्यायकारकरीत्या अधिग्रहित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना त्वरित मिळाव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मंगळवारी सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले.अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्या या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मुंबई-भुसावळ पॅसेंजरसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ता हंसराज वडघुले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे रेल रोको आंदोलन करण्यात आले. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय येथे निदर्शने करून विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, इंडिया बुल्स या कंपनीच्या रेल्वे ट्रॅकसाठी नाशिक व सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाच हजार एकर जमीन अधिग्रहित केली आहे, एमआयडीसी कायद्याचा वापर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. जिल्ह्यात रेल्वे व हायवेसाठी बेकायदेशीररीत्या जमिनीवर डिमार्केशन केले जात असून, ते त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी गोविंद पगार, नितीन रोठे-पाटील, शरद लभडे, किरण देशमुख, सोमनाथ बोराडे, हेमंत पागेरे, प्रभाकर भोसले, नीलेश कुसमोडे, हिरामण वाघ, विकी गायधनी आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रेल रोको
By admin | Published: May 13, 2015 1:13 AM