पंचवटी : निमाणी बसस्थानकासमोरील सूर्या आर्केडखाली असलेल्या रस्त्यावर थांबा नसताना रिक्षा थांबत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याने वाहतूक शाखेने या बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निमाणी बसस्थानकात दर पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने बसेसची ये-जा सुरू असते, त्यातच काट्यामारुती व सेवाकुंज रस्त्याकडून येणारी दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ यामुळे अनेकदा निमाणी बसस्थानकासमोर वाहतूक कोंडी निर्माण होते. सूर्या आर्केडखाली असलेल्या रस्त्यावर दररोजच रिक्षावाले रिक्षा उभ्या करून प्रवासी भरतात त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. वाहतूक शाखेचे कर्मचारी निमाणी, दिंडोरीनाका भागात तैनात करण्यात आलेले असले तरी या कर्मचाऱ्यांचे या रिक्षाचालकांकडे लक्ष वेधले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
भर रस्त्यात रिक्षा थांबा; वाहतूक कोंडी
By admin | Published: March 09, 2016 11:32 PM