नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय्य मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने नाशिकच्या द्वारका चौकात गुरुवारी (दि. १७) आज तीव्र निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे व कार्याध्यक्ष समाधान जेजूरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याने समता परिषदेसह सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने शुक्रवारी राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन करत राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. नाशिक शहरातील द्वारका चौकात जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र निदर्शने करत रास्ता रोको केला. यावेळी ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणना करण्यात यावी, यासह विविध न्याय्य मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. ओबीसींच्या मागण्यांबाबत सुरू केलेली ही आमची रस्त्यावरची लढाई ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहील, असे दिलीप खैरे यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्यासह विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजूरकर, नगरसेवक संतोष गायकवाड, समीना मेमन, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, तानाजी जायभावे, कविता कर्डक, रंजना पवार, सदाशिव माळी, समाधान जाधव, योगेश कमोद, अमर वझरे, ओबीसी संघटनांचे पदाधिकारी अंबादास खैरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो-
घोषणांनी परिसर दणाणला
ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे, ऊठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे, जय ज्योती जय क्रांती, ओबीसीचे राजकीय आरक्षण, हा आमचा हक्क आहे. हक्काचे आरक्षण आमची चळवळ, न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींचे पक्के आहे, ओबीसी आरक्षणाचा हक्काचा वाटा, केंद्र सरकार लवकर द्या इंपेरिकल डाटा, नही चलेगी नही चलेगी दादागिरी, नही चलेगी, ओबीसींच्या आरक्षणाला जाऊ देऊ नका तडा, ओबीसी आक्रोश आता देशव्यापी लढा... अशा घाेषणा देऊन संघटनांनी, आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.