नाशिक: गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नदीत मिसळणारे सांडपाणी तत्काळ थांबवा. तसेच मलनिस्सारण केंद्रातील यंत्रणा अद्ययावत करून निळ्या रेषेत नदीच्या जागेत होणारे सिमेंट-कॉँक्रीटचे बांधकाम तातडीने रोखण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मलनिस्सारण केंद्रातून सांडपाण्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया केली जात नसेल तर यासंबंधित ठेकेदाराला दोषी धरून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला.ब्रम्हगिरी पर्वतावरून गोदावरीचे जल कलश घेऊन निघालेल्या अविरल निर्मल गोदावरी साक्षरता यात्रेत भुजबळ यांनी गुरूवारी (दि.६) सहभाग घेतला. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, याचिकाकर्ता गोदाप्रेमी राजेश पंडित यांच्यासमवेत त्यांनी गोदावरीच्या काठावर जाऊन पाहणी केली. यावेळी मनपा गोदावरी संवर्धन कक्ष, स्मार्टसिटी कंपनी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते.दरम्यान, भुजबळ यांनी तपोवन, टाकळी पूल, गोदापार्क या भागातील गोदाकाठाला भेट दिली. यावेळी ते म्हणाले, नदीचे प्रदूषण खूप वाढले असून ही चींतेची बाब आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकांमध्ये नदी शुद्धीकरण तसेच प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने सरकारने योग्य ती पाऊल उचलली आहे. त्यादृष्टीने अधिक सुधारणा करण्यासाठी आदेश देण्यात येतील. त्यानंतरही जर यामध्ये सुधारणा होणार नसेल तर सरकारी बडगा उगारला जाईल. गोदापात्रात गटारींचे तसेच कारखान्यांचे येणारे दुषित पाणी तत्काळ थांबवावे, जे कारखाने सांडपाणी नाल्यांद्वारे गोदावरीसह तिच्या उपनद्यांमध्ये सोडत आहे, त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशदेखील त्यांनी यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सगर यांना दिले.
गोदावरीत जाणारे सांडपाणी रोखा, अन्यथा कारवाईला सामोरे जा : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:17 PM
ब्रम्हगिरी पर्वतावरून गोदावरीचे जल कलश घेऊन निघालेल्या अविरल निर्मल गोदावरी साक्षरता यात्रेत भुजबळ यांनी गुरूवारी (दि.६) सहभाग घेतला.
ठळक मुद्देठेकेदाराला दोषी धरून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारासुधारणा होणार नसेल तर सरकारी बडगा उगारला जाईल