कसबे सुकेणे - ओझर-सुकेने रस्त्यावरील दिक्षी गावात अवैध दारू विक्रीच्या विरोधात आदिवासी महिला आक्रमक झाल्या असून संबंधित अवैध दारू विक्री होणाऱ्या हॉटेलसमोर महिलांनी सुमारे एक तास आंदोलन करत दारू विक्री बंद करण्याची जोरदार मागणी केली.
गेल्या महिन्यापासून निफाड तालुक्यातील दिक्षी गावातील आदिवासी महिला या अवैध दारू विक्री विरोधात आक्रमक होत असून ओझर पोलीस स्टेशन व दिक्षी ग्रामपंचायतीस निवेदन दिले तरीही दारू विक्री करणाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपले धंदे सुरू ठेवले. अवघ्या पाच दिवसांपूर्वी एका हॉटेलवर धाड टाकून महिलांनी संताप व्यक्त करत अवैध दारू विक्री उघड केली होती. त्यानंतरही दिक्षी गावात व परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याने शुक्रवारी (दि.२२) रात्री उशिरा आदिवासी महिलांनी ओझर- सुकेना रस्स्यावर ठिय्या आंदोलन केले. पोलीस पाटील विजय गहिले यांनी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर ओझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी भाजपचे यतीन कदम यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.