देवळाली कॅम्प : दारणा नदीला आलेल्या पुराचे पाणी बुधवारी दुपारपर्यंत पुलावरून वाहत असल्याने नानेगाव, शेवगेदारणा, भगूर, शेणीत, वंजारवाडी, गोंदे या भागातील वाहतूक बंद होती. दारणा नदीला आलेल्या पुराचे पाणी बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पुलावरून वाहत असल्याने नानेगाव, शेवगेदारणा, भगूर, शेणीत, वंजारवाडी, गोंदे येथील वाहतूक बंदच होती. यामुळे या भागाचा इतरांशी संपर्क तुटला होता. दुपारनंतर दारणा नदीतील पुराचे पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली. दारणातील पाणी कमी न झाल्याने दोनवाडे, संसरी गावची स्मशानभूमी दुपारपर्यंत पुराच्या पाण्याखालीच होती. तर शेवगेदारणा व नानेगाव येथील नदीलगतच्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. मुसळधार पावसामुळे देवळाली कॅम्प येथील जुन्या रेल्वे स्टेशनवाडीला जोडणारा छोटा पुल खचल्याने या परिसरातील रहिवाशांना मंगळवारची रात्र देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर काढावी लागली. तसेच साठे नगरला जोडणारा नागजीरा नाल्यावरील पुल खचल्याने तेथील रस्ता बंद झाला आहे. देवळाली कॅम्प भागामध्ये बुधवारी रस्त्याच्या कडेने ठिकठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. गटारी, नाले, चेंबर तुंबल्याने अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते. तसेच सोसायटी परिसरामध्ये देखील पाणी साचल्याने रहिवाशांना मोठी कसरत करत यावे-जावे लागत होते. छावणी परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी साचलेले पाणी मार्गस्थ करण्यासाठी दिवसभर उपाययोजना करत होते. पुर आणि पावसामुळे खंडित झालेला वीज प्रवाह बुधवारी सकाळी पूर्ववत सुरू झाला होता. (वार्ताहर)
नानेगाव, शेवगेदारणा परिसरातील वाहतूक बंद
By admin | Published: August 04, 2016 1:24 AM