केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात देशभरात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दिल्लीत तर शेतकरी आंदोलन सुरू असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि. १८) देशभरात हे आंदोलन करण्यात आले. नाशिक रोड येथे रेल रोको होणार असल्याने सकाळपासूनच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवून आंदोलकांवर नजर ठेवण्यात आली होती. मात्र, त्यानंतरदेखील पोलिसांना चकवा देत कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात रेल रोको केलाच. या वेळी केंद्र सरकार, कृषी कायदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाेरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलन सुरू होताच तत्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि रेल रोको करणाऱ्या किसान सभेचे राज्य सचिव कॉ. राजू देसले, माकपाचे ॲड. तानाजी जायभावे, शेतकरी कृती समितीचे गणेश उन्हवणे, बहुजन शेतकरी संघटनेचे रमेश औटे, माजी उपमहापौर गुलाम शेख, विजय दराडे, मुकुंद रानडे, एआयएसएफचे विराज देवांग, अरुण शेजवळ, सुदाम बोराडे, दादाभाऊ शिंदे, मिलिंद निकम, कैलास चव्हाण, हरीभाऊ जाधव, बाळासाहेब डोंगरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो..
किसान रेलच अडवली
केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात रेल रोकाे करणाऱ्यांनी अडवलेली रेल्वे नेमकी किसान पार्सल रेल्वे होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संघटनांनी शेतमालाची वाहतूक करणारी रेल्वे अडवल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता.