नाशिकरोड : जेलरोड इंगळेनगर पाण्याची टाकी चौफुलीवर गतिरोधक, सिग्नल बसविण्यात यावे व जेलरोड मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी सकाळी जेलटाकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.जेलरोड रस्त्यावर विविध शाळा, महाविद्यालय, मुद्रणालय असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी, कामगार व रहिवाशांची दिवसभर मोठी वर्दळ असते. जेलरोड मार्गावर यापूर्वी अनेकवेळा लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडल्या असून, अनेक निष्पापांना त्यामध्ये प्राण गमवावे लागले आहे. जेलरोड मार्गावरून अवजड वाहतुकीस बंदी असतानादेखील सर्रासपणे अवजड वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. दोन दिवसांपूर्वी जेल पाण्याची टाकी येथे ट्रकच्या अपघातात कारागृह पोलीस मदन मोरे यांचा मृत्यू झाला होता. मनपा व पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जेलरोड पाण्याची टाकी येथे शिवसेनेचे पदाधिकारी राजू लवटे, बाळासाहेब गाडगीळ, बाळासाहेब शेलार, विक्रम खरोटे, शिवा ताकाटे, नितीन चिडे, बाबा बच्छाव, मसूद जिलानी, अरुण मुळाणे, महेंद्र पोरजे, योगेश नागरे, परिक्षित तळोकार, अमित आढाव, राजेश बोराडे आदिंसह शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन छेडले. यामुळे जेलरोडच्या दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. सदर बाब नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, उपनगरचे अशोक भगत यांना समजताच त्यांनी घटनास्थळी मोठ्या बंदोबस्तासह धाव घेतली. आंदोलनकर्त्यांनी जेलरोड मार्गे अवजड वाहनांस बंदी, इंगळेनगर चौफुलीवर गतिरोधक व सिग्नल यंत्रणा बसवावी, तसेच शाळा-महाविद्यालय आदि महत्त्वाच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारावे, अशी जोरदार मागणी केली. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या आत इंगळेनगर चौफुलीवर गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे व सूचना-माहिती फलक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)
अवजड वाहनांच्या बंदीसाठी रास्ता रोको
By admin | Published: August 05, 2015 10:28 PM