ममदापुर : पिण्याच्या पाण्याचा टँकर द्या, जनावरांना चारा द्या, संपूर्ण कर्ज माफी, वीजबिल माफी, मजुरांना कामे द्यावी आदिंसह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी येवला तालुक्यातील राजापूर चौफुलीवर शिवसेनेच्या वतीने अर्धातास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक खोळंबली होती.राजापूर परिसरात तीन वर्षांपासून दुष्काळाची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दोन तीन किलोमीटर पायपीट करावी लागते, तरी पाणी मिळत नाही. राजापूर गाव मोठे असून, वाड्या -वस्त्यांमध्ये मोठी लोकवस्ती आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे चार-पाच जनावरे आहेत. त्यांना पाण्यासाठी पाणी नाही. राजापूरला दोन टँकर सुरू आहेत; परंतु आजपर्यंत कधीच दररोज टँकर आले नाही. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. राजापूर शिवसेना शाखाप्रमुख अशोक आव्हाड, विठ्ठलराव मुंढे याच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गोरख घुगे, आशोक मुंढे, सोपान आव्हाड, अनिस सैयद, जनार्दन विंचू, नामदेव घुगे, दत्तू मुंढे, शिवाजी आव्हाड, धर्मराज अलगट यांच्यासह शिवसैनिक व महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. येवला तालुका पोलीस निरीक्षक वाघमारे, पोलीस सह-निरीक्षक खैरनार यांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर )
राजापूरला शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्ता रोको
By admin | Published: May 23, 2016 11:35 PM