नाशिक : अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी जागृत नाशिककर व सर्व सामाजिक चळवळींच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि़१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ यानंतर मोर्चेकऱ्यांनी मेहेर सिग्नलवर टायर जाळून शासनविरोधी घोषणा देऊन आपला संताप व्यक्त केला़ या आंदोलनामुळे या ठिकाणची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती़ कोपर्डी येथील नववीतील मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली़ या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून, दुपारच्या सुमारास जागृत नाशिककर व सर्व सामाजिक चळवळीचे प्रमुख श्रीराम खुर्दळ, नितीन रोटे पाटील, राजू देसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सरकार व पोलिसांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून नराधमांना फाशीची शिक्षेची मागणी मोर्चेकरी करीत होते़जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील घोषणाबाजीनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मेहेर सिग्नलवर येऊन ठाण मांडले़ या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी दोन टायर पेटवून रास्ता रोको केला़ पोलिसांना मोर्चेकऱ्यांच्या या आंदोलनाची कल्पना नसलेल्या या ठिकाणी सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली़ यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ़ सीताराम कोल्हे या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सुमारे वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़ या मोर्चामध्ये नितीन रोटे पाटील, श्रीराम खुर्दळ, अजिंक्य गुळवे, कपिल गोवर्धने, राजेंद्र मेढे, कृष्णा भोर, विकी गायधनी, सचिन पवार, उमेश पाटील, शरद लभडे, मयूर पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)
रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2016 1:00 AM