नाशिक : स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजने अंतर्गत धुमाळ पॉइंट (वंदे मातरम चौक) ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक आणि कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी (दि.१०) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र दिले आहे. अर्थात, स्मार्ट सिटी कंपनीने सदरचे काम अवघे दोन महिन्यांत पूर्ण करून परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.स्मार्ट सिटीची कामे नेहमीच वादग्रस्त ठरली आहेत. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्टरोड गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गाजत आहे. अवघा एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लागला आणि खर्चदेखील सतरा कोटींच्या वर गेला आहे. त्यानंतरदेखील अपेक्षित काम पूर्ण झालेले नाही. त्यानंतर गेल्यावर्षी मध्येच कंपनीने गावठाण विकासाची कामे हाती घेतली आहेत. त्यात रस्त्याची विकासकामे सुरू झाली असून, आता वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनीने नियोजन केल्यानंतर पोलीस यंत्रणेनेदेखील अधिसूचना जारी केली आहे. तथापि, आता या कामविषयी शंका व्यक्त केली जात असतानाच आता हे काम तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक असलेल्या शाहू खैरे यांनी केली आहे. स्मार्ट सिटीतील अभियंत्यांना मुळातच या भागातील गटारींची माहिती नाही. तसेच महापालिकेच्या अभियंत्याचा आणि कंपनीच्या अभियंत्याचा समन्वय नाही. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मुळातच या मार्गाच्या खालून अनेक नाले जात आहेत. भद्रकाली पंपिंग स्टेशन येथील काही नाले याच भागातून पुढे सरस्वती नाल्याला मिळतात आणि पुढेही अनेक नाले मिळतात. आता पावसाळा सुरू असताना अशाप्रकारचे काम सुरू केल्यानंतर पाणी साचून अनेक दुकानदार आणि नागरिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे काम सुरू करू नये, अशी मागणी खैरे यांनी केली आहे.