नाशिकरोड : शाहूपथ येथील मनपाच्या बिटको रुग्णालयाबाहेरील दोन औषध दुकानांचे बाहेरील वरच्या बाजूस लावलेले नामफलक व इतर दोन दुकानांचे पत्रे, लोखंडी ग्रीलचा दरवाजा मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने काढून टाकला. वाहतुकीला अडथळा ठरणारे रस्त्यावरील विक्रेत्यांचे अतिक्रमण सोडून दुकानांवरील नामफलक ‘अतिक्रमण’च्या नावाखाली काढल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस बांधलेल्या मनपाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सहा-सात गाळे आहेत. त्या ठिकाणच्या एका व्यावसायिकाने औषधाच्या दोन दुकानांवरील नामफलकाच्या अतिक्रमणाबाबत मनपाकडे तक्रार केली होती. मनपा अतिक्रमण विभागाने बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने पी.के. व सुराणा मेडिकल दुकानाच्या बाहेरील वरच्या बाजूस असलेले अतिक्रमित नामफलक जेसीबीच्या साह्याने काढून टाकले. तसेच एका दुकानदाराने पुढील बाजूस लावलेले पत्रे व दुसऱ्या दुकानांचे शटर बाहेरील बाजूस असलेला लोखंडी ग्रीलच्या दरवाजा जेसीबीच्या साह्याने काढून टाकला. दोघा मेडिकल दुकानदार मालकांनी मनपा अतिक्रमण विभागाने दुकानाच्या नामफलकाबाबत सूचना, नोटीस न देता कारवाई केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तर मनपा अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी बाजूच्या दुकानदाराने अतिक्रमित नामफलकाबाबत तक्रार केल्याने कारवाई केल्याचे सांगितले.दुकानाच्या बाहेरील वरच्या बाजूला हजारो रुपये किमतीचे असलेल्या नामफलकांची कुठल्याही प्रकारची अडचण नसताना तक्रार व अतिक्रमण असल्याच्या कारणावरून हटविल्याने व्यावसायिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.कारवाईबद्दल संशय व्यक्तशाहू पथवर रस्त्याच्या दुतर्फा व फुटपाथवर मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचे अतिक्रमण त्या मार्गावरून येणे-जाणे जिकिरीचे होऊन जाते. बिटको रुग्णालयातून रुग्ण ने-आण करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र मनपा अतिक्रमण विरोधी पथक तक्रारींची ‘तत्काळ’ दखल घेत केलेल्या कारवाईबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
दुकानांचे अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:40 AM