वडेल : येथे नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अजंग परिसरातही गारपीट व वादळामुळे पिकांसह शेडनेटचे व रोडनेटवरील पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. याबाबतीत नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या गारपीट व वादळामुळे शेतकऱ्यांच्या डाळींब, सिमला मिरची यांसह टमाटा, चारा व कांद्याच्या बीचे (उळे) नुकसान झाल्याचे पाहणीत आढळले आहे.कांद्याचे बी (उळे) वादळामुळे पूर्णत: मातीमोल झाले असून, टमाटा पिकाला तडे गेले आहेत. तसेच सिमला मिरची गळून पडल्याचे चित्र असून, शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वडेल येथील दादा सोनवणे व तुषार सोनवणे या शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले असून, अजंग शिवारातील रामसिंग देवरे यांचे शेडनेट फाडून सिमला मिरची पिकाचे नुकसान झाले. यासंदर्भात अजंग येथील तलाठ्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही, तर वडेलचे तलाठी नीळकंठ दळवी यांनी नुकसानीबाबत तहसील कार्यालयात माहिती दिल्याचे सांगितले. (वार्ताहर)
अजंग परिसरात वादळाने नुकसान
By admin | Published: May 09, 2016 11:13 PM