पाटणे : परिसरात बुधवारी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास जवळपास तासभरापेक्षा जास्त काळ वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस कोसळला. त्यामुळे रब्बीतील काढणी झालेल्या व उघड्यावर पडलेल्या कांदे, हरभरा, मका, गहू आदी पिकांचे नुकसान झाले. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवारी दिवसभर प्रचंड उकाड्याने सर्वजण हैराण झाले होते. त्यातच दुपारपासून ढगाळ वातावरण होते. वेधशाळेने बेमोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला उन्हाळ कांदा प्लॅस्टिक, ताडपत्री इतर आच्छादन साहित्याने झाकून ठेवला होता. परंतु, वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे हे आच्छादन उडून गेले. त्यामुळे झाकून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने बळीराजाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी वादळामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले असून, बेमोसमी पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरा पूर्ववत झाला.
बेमोसमी पाऊस व वादळामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कारण अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे उन्हाळ कांदा काढणी व चाळीत भरण्याचे काम बाकी असल्याने शेतकरी धास्तावला आहे.