पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
कळवण : तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गेल्या दोन दिवसांत ८५ घरांची पडझड झाली असून, काही ठिकाणी झाडेही पडली आहेत. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी वाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे यांनी तालुक्यात पडझड झालेल्या घरांची पाहणी केली असून, महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले असून, मंडल अधिकारी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल कापसे यांच्याकडे सादर केले आहेत. वादळी वाऱ्यामुळे पश्चिम पट्ट्यात अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. काही घरांची पडझड झाली असून, झाडे उन्मळून पडली आहेत. वादळी वाऱ्यामुळे नुकसानीचे महसूल यंत्रणेने घटनास्थळी जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनस्तरावर अहवाल सादर करण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी. ए. कापसे यांना केली आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देऊन दिलासा देण्याची मागणी पंचायत समितीच्या सभापती मनीषा पवार, उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष संदीप वाघ, पंचायत समिती सदस्य जगन साबळे, मीनाक्षी चौरे, आशाताई पवार, पल्लवी देवरे, लालाजी जाधव यांनी केली आहे.
-------------
...या गावांना फटका
तालुक्यात झालेल्या नुकसानीत अभोणा महसूल मंडलात कुंडाणे येथील एक, मोहपाडा येथील पाच, सुकापूर येथील एक, नांदुरी येथील अठरा, सप्तशृंग गड येथील चार, दरेगाव वणी येथील एक, जामले वणी येथील तेवीस, खिराड येथील एका घराचे नुकसान झाले आहे. कनाशी महसूल मंडलात गोळाखाल येथे एक, लखानी येथे पाच, खडकी येथे एक, कोसवण येथे एका घराचे नुकसान झाले आहे. मोकभणगी मंडलात खडेदिगर येथे तीन, पुनदनगर येथे एक, धार्डेदिगर येथे एक, रवळजी येथे एका घराचे नुकसान झाले आहे. कळवण मंडलात मुळाने वणी येथील तीन व कातळगाव येथील एका घराचे नुकसान झाले आहे. नवी बेज मंडलात भादवण येथे एका घराचे नुकसान झाले. दळवट मंडलात दळवट, शेपुपाडा, वडाळे येथे एकेका घराचे नुकसान झाले आहे. घरांचे पत्रे उडणे, भिंत पडणे, काही घरांचे अंशतः तर काही घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.