सिन्नर : वादळाने सिन्नर शहर व उपनगरांतील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत आहे. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून १५ टँकरद्वारे उपनगरांतील रहिवाशांना मोफत पाणीपुरवठा करण्यात आला.
कडवा पाणीपुरवठा योजनेला साकूर फाटा उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. नगराध्यक्ष किरण डगळे यांनी चार दिवसांपूर्वी एक्स्प्रेस फिडर वाहिनीचे काम पूर्ण करून घेतले. तथापि, सातपूर येथील केंद्रातून साकूर फाटा येथे जोडलेल्या ३३ केव्हीए वाहिनीला वादळामुळे अडथळे आले. वीज खांब पडणे, इन्सुलेटर तुटणे यामुळे वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. त्याचा कडवा पाणीपुरवठा योजनेवर दुष्परिणाम झाला. ४५० अश्वशक्तीचे वीजपंप कायम सुरू ठेवणे अवघड होऊन बसले.
दारणा नदीवरील योजनेलाही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. वादळामुळे वारंवार वीज खंडित होत होती. त्यामुळे सिन्नरला पाणीपुरवठा करणारी ही योजनाही दोन दिवस अडखळत चालली. शहराची गरज भागवण्यासाठी ८० लाख लिटर पाणी उपलब्ध करणे प्रशासनासाठी जिकिरीचे झाले. त्यामुळे नागरिकांची निकड ओळखून नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी सरदवाडी मार्गावरील उपनगरांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला.
---------------
९० हजार लिटर पाणी मोफत
पाच टँकरद्वारे उपनगरांत एका दिवसात ९० हजार लिटर पाणी वितरित केले. अंबिका रो हाऊस, महालक्ष्मीनगर, केला कॉलनी, मारुती मंदिर परिसर, वसीम बेकरी, पवननगर आणि गंगोत्रीनगरातील नागरिकांना पाण्याचा लाभ झाला. उपनगरांतील प्रत्येक गल्लीत टँकर फिरवण्यात आले.
----------------
पाणी वितरणाचे सुयोग्य नियोजन
पाणी वितरित करताना महिलांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मास्क घालून येणाऱ्या महिलांनाच पाणी देण्यात आले. शिवाय अंतर राखून पाणी वितरित केले. त्यामुळे पाणी मिळवण्यासाठी उडणारी धावपळ योग्य नियोजनामुळे दिसून आली नाही.
---------------------
सिन्नरला सरदवाडी मार्गावरील उपनगरांत टँकरने केलेला पाणीपुरवठा. (२० सिन्नर ४)
===Photopath===
200521\20nsk_8_20052021_13.jpg
===Caption===
२० सिन्नर ४