कुपोेषित बालकांना व गरोदर मातांना न्युट्रीशियन खरेदी करण्यावरही वादळी चर्चा झाली. या खरेदीसाठी १७ कोटी १३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली असता ७ कोटी रुपये शासनाने दिले. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली व चार निविदांपैकी दोघे त्यासाठी पात्र ठरविण्यात आल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी दीपक चाटे यांनी दिली. त्यावर आत्माराम कुंभार्डे, उदय आहेर, दीपक शिरसाठ, यतीन पगार, रमेश बोरसे यांनी प्रश्नांचा भाडीमार केला. बाजारातील दर व पुरवठादाराच्या दराची तपासणी केली काय? बाजारात ८० रुपयांना मिळणारे न्युट्रीशियन १३७ रुपयांना खरेदीचे कारण काय, असे प्रश्न उपस्थित केले. रमेश बोरसे यांनी सदरचा विषय रद्द करावा, अशी मागणी केली. यावर सभापती अश्विनी आहेर यांनी सफाई देण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी, खरेदी समितीच्या बैठकीत दर निश्चित करण्यात आले असून, कमी दरात तेच न्युट्रीशियन मिळत असेल तर सदरच्या पुरवठादाराने निविदेत भाग का घेतला नाही, असा प्रश्न उपस्थित करून सदरची प्रक्रिया योग्य रितीने हाताळल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावर औषध व न्युट्रीशियन खरेदीला मान्यता देण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात यावे व अनियमितता झाल्यास संबंधित खातेप्रमुखांना जबाबदार धरण्यात यावे, असे आत्माराम कुंभार्डे यांनी सांगितले.
औषधे, न्युट्रीशियन खरेदीवर वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:32 AM