दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली असून, यंदा तीन लाख मे.टन ऊस गाळप होऊन विक्रमी साखर उतारा मिळवून ३,६५,९०० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे, अशी माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.कादवा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा पुरेसा ऊस नसतानाही योग्य नियोजन करीत तीन लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. कमी दिवसात अधिक गाळप करणे व चांगला साखर उतारा मिळावा यासाठी कादवा व्यवस्थापनाने आधुनिकीकरणाची वाट धरत मशिनरी दुरु स्ती करताना त्या आधुनिक व अधिक क्षमतेच्या बसविल्या होत्या. त्यामुळे यंदा कमी दिवसांत जास्त गाळप करणे शक्य झाले तसेच जास्तीचा साखर उतारा मिळविला आहे तो कारखान्याचा इतिहासात सर्वाधिक आहे या हंगामात १६२ दिवसांत ३,००,२०५ गाळप झाले असून १२.१९ विक्रमी साखर उतारा मिळत ३,६५,९०० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.हंगाम सांगताप्रसंगी ऊसतोड कामगारांनी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाळासाहेब उगले, चीफ इंजिनिअर विजय खालकर, चीफ केमिस्ट सतीश भामरे, चीफ अकाउंटंट जे.एल. शिंदे, शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ, युनियन अध्यक्ष सुनील कावळे आदींसह कामगार उपस्थित होते.यंदा अधिक साखर उतारा मिळाल्याने पुढील वर्षी उसाला या वर्षीच्या एफ.आर.पी. पेक्षा अधिक भाव मिळणार असून, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी. हंगाम यशस्वीतेसाठी सर्व ऊस उत्पादक, सभासद, अधिकारी, कामगार, ऊसतोड मुकादम, कामगार, वाहतूकदार, यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. पुढील हंगामापर्यंत नव्याने मिल व टर्बाइन सुरू करण्याचा प्रयत्न असून कमी दिवसांत जास्तीचे गाळप करण्याचे प्रयत्न आहे.- श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा
कादवाच्या गळीत हंगामाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:46 AM