नाशिक : मतदानाला काही तासांचा अवधी असताना भावी आमदारांकडून मतदारराजाने आपल्यालाच मते द्यावीत, यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या आणि युक्त्या वापरण्यास सुरुवात केली आहे. मतदारांवर सर्वच प्रकारे साम, दाम, दंड व भेद या ब्रिटिशांच्या कूटनीतीचा वापर सुरू केल्याची चर्चा नागरिकांत आहे. शहरात अशाच प्रकारे काही भावी आमदारांकडून अर्थात उमेदवारांच्या समर्थकांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मतदारांवर प्रभाव आणि दहशत बसविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. एका पोलीस ठाण्यात मागील भांडणाची कुरापत काढून अमुक एक उत्सव का भरविला, असे सांगत पोलीस रेकॉर्डवर असलेल्या काही ‘भार्इंनी’ धमकावल्याची तक्रार आल्याचे कळते. काहींना साम आणि काहींना दामच्या आधारे प्रभाव टाकण्यात येत असल्याचे कळते. काही उमेदवारांनी तर चक्क जातीच्या आधारे मतदान करण्यासाठी समाजबांधवांना भावनिक आवाहन करण्यात येत असल्याचे कळते. जातीच्या आणि समाजाच्या आधारे मतदारांमध्ये भेद निर्माण करून आपल्यालाच मते देण्याचे आर्जव सुरू आहे. (प्रतिनिधी)
कूटनीतीचा वापर
By admin | Published: October 15, 2014 12:45 AM