नांदगाव : गेले ते दिवस... उरल्या त्या अडचणी.... अशी अवस्था जिल्ह्यातील अनेक पथकर वसुली नाक्यांची झाली आहे. ज्याठिकाणी गती कमी करून व थांबून पथकर भरावा लागत असे. तिथल्या नाक्यांची मुदत संपल्याने ठेकेदार वसुलीसाठी उभारलेली बांधकामे तशीच ठेवून निघून गेले आहेत. त्यामुळे येथील वास्तूंचे भग्नावशेषात रु पांतर झाले आहे. मोडकळीस आलेल्या भिंती, तुटलेले दरवाजे, खिडक्या यांच्या जवळ काही ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या मद्याच्या बाटल्या तेथील तळीरामांच्या अस्तित्वाच्या साक्षीदार ठरतात. तर सिगारेट, बिडी पिण्याची तल्लफ भागविणारे महाभाग, पत्ते खेळतांना भिंतींच्या आडोशामागे दिसतात. वाहनातून जाणाऱ्या प्रवाशांना हे दूरदर्शन नित्याचे झाले आहे. मनमाड- चांदवड रस्त्यावर वसुलीसाठी उभारलेली अशीच एक टपरी मोडून रस्त्यावरच येऊन पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. शासनाबरोबरचे करार काही कारणांमुळे मोडीत निघाल्याने अनेक ठिकाणी टोल वसुलीसाठी उभारलेली बांधकाम्रे वाहनांना त्रासदायक ठरत आहेत. करार संपुष्टात आल्यानंतर उभारलेले स्ट्रक्चर तसेच रस्त्यावर उभे असते. नाक्यावरचे गतिरोधक वाहनांना अडथळे ठरत असतात. करार संपल्यानंतर उभारलेली बांधकामे ठेकेदाराने स्वत: काढून घेण्यासंबंधी करारात तरतूद असायला हवी. तशी ती असेल तर बांधकामे का काढून घेतली जात नाहीत. हा संशोधनाचा विषय आहे. जर बांधकामे काढून घेण्याची तरतूद नसेल तर संबंधित विभागाने ती काढून घ्यायला नको का ? मोडकळीस आलेले अवशेष रस्त्याच्या सौंदर्यास बाधा ठरत आहेत.
पथकर नाक्यांची भग्नावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 2:27 PM