-----
नाशिक : त्र्यंबकेश्वर भागातून भटकंती करत वाट चुकलेले एक मोठे काळ्या मुखाचे वानर रविवारी (दि. ११) गंगापूर गावाच्या वेशीवर येऊन हुप...हुप...ओरडू लागले. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूच्या मोकाट श्वानांनी धाव घेत चहूबाजूंनी घेरून हल्ला चढविला. या हल्ल्यात वानर गंभीरपणे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमी वानराला रेस्क्यू करत अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन दवाखान्यात दाखल केले.
शहरात आठवडाभरापूर्वीच इंदिरानगर भागातील एका मोठ्या गृहप्रकल्पात लालमुखी माकडाने आश्रय घेतला होता. आठवडाभर या माकडाला पकडण्यासाठी वन कर्मचारी प्रयत्न करत होते. या माकडाला तीन दिवसांपूर्वीच सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यास यश येताच पुन्हा शहराच्या वेशीवर वानर-श्वान संघर्ष उभा राहिला. वन कर्मचारी, इको-एको फाउंडेशनच्या वन्यजीवप्रेमींनी रविवारी धाव घेत हा संघर्ष रोखला. मात्र तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्यात वानर गंभीरपणे जखमी झाले होते. जखमांमधून रक्तस्राव होऊ लागल्याने वानराला झाडावर चढता येणेही कठीण झाले होते. यावेळी गंगापूर गावातील काही ग्रामस्थांनी धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावले. यावेळी वानर आक्रमक झाल्याने एका नागरिकाला वानराने नखांनी ओरबाडल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, रस्त्यावर ठिय्या दिलेल्या वानराला वन कर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले आदी वन्यजीवप्रेमींनी जाळीच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. शासकीय वाहनातून काही मिनिटांत वानराला अशोकस्तंभावरील पशू वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले गेले. येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार करत मोठ्या जखमेवर टाके घालत रक्तस्राव थांबविला. उंटवाडी येथील वनविश्रामगृहात वानराला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. गंभीररीत्या जखमी झाल्याने वानराची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
---
फोटो nsk वर पाठविले आहेत.